कुलाब्यातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अखेर मुकेश मिलमध्ये स्थलांतर; राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 11:08 IST2025-08-06T11:07:59+5:302025-08-06T11:08:30+5:30
‘लोकमत’ने सोमवारी याबाबत वृत्त दिले होते. त्यानंतर मंगळवारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि इतर अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुकेश मिलच्या खासगी जागेत स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला.

कुलाब्यातील ‘त्या’ विद्यार्थ्यांचे अखेर मुकेश मिलमध्ये स्थलांतर; राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर महापालिकेचा निर्णय
मुंबई : कुलाब्यातील पालिका शाळेच्या दोन्ही इमारतींमधील ४,००० विद्यार्थ्यांपैकी प्राथमिक शाळेतील निम्म्या विद्यार्थ्यांना येत्या ८ दिवसांत जुन्या शाळेच्या इमारतीसमोरील मुकेश मिलमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. स्थानिक आमदार व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निर्देशानंतर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
‘लोकमत’ने सोमवारी याबाबत वृत्त दिले होते. त्यानंतर मंगळवारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अमित सैनी आणि इतर अधिकाऱ्यांनी शाळेच्या इमारतीची पाहणी केली. त्यानंतर मुकेश मिलच्या खासगी जागेत स्थलांतराचा निर्णय घेण्यात आला. शाळेतील उर्वरित विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. मात्र, इंग्रजी प्राथमिक शाळेतील १,४८२ विद्यार्थ्यांना इमारतच उपलब्ध नव्हती. त्यामुळे ते घरूनच ऑनलाइन शिक्षण घेत होते. इतर सहा प्राथमिक शाळा मिळून ८३० विद्यार्थ्यांना पालिका रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे. मात्र, ही जागा पुरेशी नसून शिक्षणात अडथळा होतो आहे, ही बाब पालकांनी राहुल नार्वेकर यांच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे पालिका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी मुकेश मिलच्या जागेत शाळा तात्पुरती स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला.
विद्यार्थ्यांचे स्थलांतर करण्याआधी ६ महिन्यांपूर्वीच नियोजन का केले नाही? अधिकाऱ्यांचे नियोजन चुकल्यामुळेच अशी परिस्थिती उद्भवली आहे. या गोंधळात विद्यार्थ्यांचे नाहक शैक्षणिक नुकसान झाले आहे.
आनंदा होवाळ, इंडियन सोशल मुव्हमेंट
कुलाबा परिसरातील महापालिकेच्या शाळा संकुलातील धोकादायक ठरवलेल्या इमारतीमुळे एकूण २,६४१ विद्यार्थ्यांचे शिक्षण अडथळ्यात आले.
त्यानंतर मराठी-२, हिंदी-२, उर्दू-१ आणि कन्नड-१, अशा एकूण सहा शाळांतील ८३० विद्यार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात कुलाबा मार्केटमधील महापालिका हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर स्थलांतरित करण्यात आले.
इंग्रजी माध्यमिक शाळेतील ३२९ विद्यार्थ्यांना मात्र बोराबाजार येथील पालिका हिंदी शाळेच्या इमारतीत हलवण्यात आले. दरम्यान, इंग्रजी प्राथमिक शाळेतील १,४८२ विद्यार्थी अद्याप स्थलांतरित झालेले नाहीत.
त्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम झाला आहे. दुसऱ्या इमारतीतील माध्यमिक स्तरावरील १,१८९ विद्यार्थ्यांना जीपीओसमोरील मनोहरदास पालिका शाळेत वर्ग उपलब्ध करण्यात आले आहेत.
नियोजनाअभावी गोंधळ
आतापर्यंत शाळा सोडलेले विद्यार्थी - ४००