लगीन घाई! यंदा डिसेंबर महिन्यांपर्यंत केवळ आठच दिवसांचे मुहूर्त, नववर्षात किती? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 14:27 IST2025-11-06T14:27:24+5:302025-11-06T14:27:35+5:30
Vivah Muhurat 2025-26: अधिक मासामुळे फटका

लगीन घाई! यंदा डिसेंबर महिन्यांपर्यंत केवळ आठच दिवसांचे मुहूर्त, नववर्षात किती? जाणून घ्या...
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सरत्या वर्षात लग्नसोहळ्यांचा जल्लोष अवघ्या काही दिवसांपुरता मर्यादित असेल. या वर्षात केवळ आठ तर २०२६ या पुढील संपूर्ण वर्षभरात अवघे ४९ शुभ दिवस विवाह मुहूर्त आहेत. तर, उपनयनासाठी केवळ २० दिवसांचा शुभ काळ असणार आहे.
अधिक मास, ग्रहण, मलमास व चांद्रमासातील विसंगतीमुळे शुभ दिवसांची संख्या घटली आहे. पण, फेब्रुवारी ते जुलैपर्यंतच्या काळातच बहुतेक मुंज व विवाह पार पडतील. जानेवारी २०२६ मध्ये मलमास (अमुहूर्त काळ) असल्याने मुंजी होत नाहीत. तर, अधिक ज्येष्ठ मास १७ मे ते १५ जून २०२६ दरम्यान असल्याने त्या काळातही उपनयन व विवाह होणार नाहीत. त्यामुळे उर्वरित मुहूर्त गाठण्यासाठी इच्छुक वधू-वरांसह त्यांच्या कुटुंबीयांची धावपळ वाढणार आहे, असे जाणकारांनी सांगितले.
कार्यालये, बँडचे बुकिंग
लग्नहंगामासाठी हॉटेल, लॉन्स, बँक्वेट हॉल, बँडपथक आणि केटरर्स यांची आगाऊ बुकिंग सुरू करण्यात आली आहे. शहरातील लोकप्रिय मंगल कार्यालयांची बुकिंग पूर्ण झाली असून अनेकांना निराश होऊन परतावे लागत आहे. तर, डेकोरेशन, बँडपथक, केटरिंग, मंगल कार्यालये, मेकअप आर्टिस्ट यांची धावपळ सुरू झाली आहे.
२२ नोव्हेंबरपासून उडणार लग्नाचा बार
२२ नोव्हेंबरपासून पुन्हा विवाहसोहळ्यांचा हंगाम सुरू होत आहे. २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या १३ दिवसांत २२, २४, २५, २७, २८, २९ नोव्हेंबर व ३, ५ डिसेंबर असे आठ शुभ मुहूर्त आहेत.
२०२६ मध्ये ग्रहस्थिती व अधिक मासामुळे विवाहयोग्य दिवसांची संख्या घटली आहे. पण, फेब्रुवारी ते मे या काळात उत्तम योग जुळून येईल. जानेवारीत मलमास व मे-जूनमध्ये अधिक मास असल्याने थोडी उसंत मिळेल. उपनयन संस्कारांसाठी केवळ २० दिवसांचा शुभकाळ असल्याने एकाच दिवशी अनेक मुंजींचे बुकिंग होत आहे.
-वैभव रानडे, पुरोहित
विवाह, मुंजीचे दिवस
महिना - विवाह शुभ दिवस - मुंजीसाठी शुभ दिवस
- नोव्हेंबर २०२५ ६ ४
- डिसेंबर २०२५ २ २
- फेब्रुवारी २०२६ ९ ४
- मार्च २०२६ ८ ४
- एप्रिल २०२६ ६ ३
- मे २०२६ ७ ३
- जून २०२६ ५ ०
- जुलै २०२६ ६ ०