मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद; पीओपीबाबत आज सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 13:11 IST2025-06-09T13:10:21+5:302025-06-09T13:11:57+5:30

Ganeshotsav 2025: महापालिकेकडून मागील अडीच महिन्यांत गणेश मूर्तिकारांना ६३० मेट्रिक टन शाडूमातीचे वाटप करण्यात आले आहे. शाडूमातीची वॉर्डनिहाय मागणी वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

This year, the idol in Mumbai is of Shadu! 600 tons of clay were distributed | मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद; पीओपीबाबत आज सुनावणी

मुंबईत यंदा मूर्ती शाडूच्याच! ६०० टन मातीचे झाले वाटप, पालिकेच्या माेहिमेला मूर्तिकारांचा प्रतिसाद; पीओपीबाबत आज सुनावणी

मुंबई - महापालिकेकडून मागील अडीच महिन्यांत गणेश मूर्तिकारांना ६३० मेट्रिक टन शाडूमातीचे वाटप करण्यात आले आहे. शाडूमातीची वॉर्डनिहाय मागणी वाढत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने लागू केलेल्या पीओपी बंदीविरोधात मूर्तिकार संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे गणेश मूर्तिकारांचे लक्ष लागले आहे.

येत्या ऑगस्टमध्ये म्हणजे अडीच महिन्यांत गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना शाडू माती उपलब्ध केली आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना महापालिकेकडून मंडपाची परवानगी मिळवताना स्वयंघोषित हमीपत्र द्यावे लागेल, असे परिपत्रक फेब्रुवारीमध्ये काढण्यात आले होते. त्यानुसार मूर्तिकारांनी शाडू मूर्तींबाबतचे स्वयंघोषित हमीपत्र देण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्याकडील मागणी वाढल्याने शाडूमातीच्या उपलब्धतेची तयारीही महापालिकेने ठेवली आहे.

दादर, धारावीमध्ये ६४ टन, घाटकोपरमध्ये ७० टन वितरण
सन २०२३ मध्ये एकूण ४५१ टन शाडू माती उपलब्ध करण्यात आली होती. तेच प्रमाण २०२४ मध्ये ६११ टन एवढे होते. यंदा त्यात वाढ झाली आहे. त्यातील धारावी, माहीम, दादरचा समावेश असलेल्या जी उत्तर वॉर्डमध्ये ६४ टन शाडू मातीचे वाटप झाले असून, एन वॉर्ड (घाटकोपर) मध्ये ७० टन शाडू माती, के पूर्व ( अंधेरी पूर्व) ६७ टन, डी वॉर्ड (गिरगाव, ग्रँट रोड) ५६ टन आणि एफ दक्षिण वॉर्डमध्ये (परळ, लालबाग, हिंदमाता) ५६ टन शाडू माती उपलब्ध करण्यात आली आहे. 

जनजागृतीमुळे परिवर्तन
निसर्गास हानी पोहचू नये तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विविध उत्सव आयोजित केले जावेत यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. मागील वर्षभरापासूनट पालिकेने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्यात पालिकेने वॉर्डस्तरावर सोशल मीडिया, वृत्तपत्र, शाळा - महाविद्यालये यातून पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या जनजागृती करण्यात येत आहे. परिणामी शाडू मूर्तींबाबत जागृती निर्माण होऊन आता मूर्तींसाठी भाविकांकडूनही यंदा मागणी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. 

ऑनलाइन प्रक्रिया
मूर्तिकार संघटना, मुंबईकरांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रतिसाद मिळावा यासाठी मंडपाची परवानगी फेब्रुवारीपासून, तर शाडूमातीचे वाटप मार्चपासून सुरू करण्यात आले आहे. या प्रक्रिया पालिकेकडून ऑनलाइन होत आहेत.

Web Title: This year, the idol in Mumbai is of Shadu! 600 tons of clay were distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.