'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 06:24 IST2026-01-12T06:23:56+5:302026-01-12T06:24:34+5:30
'लाव रे तो व्हिडिओ'चा पुन्हा एकदा घुमला आवाज

'तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल'; आज चुकलात तर म्हणत राज ठाकरेंचा इशारा
मुंबई : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आल्यानंतर जवळपास वीस वर्षांनी दोघांची एकत्रित पहिली जाहीर सभा शिवाजी पार्कवर रविवारी झाली. या सभेविषयी सर्वत्र उत्सुकता होती सभेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. मनसैनिक आणि शिवसैनिक जोरदार घोषणा देत शिवाजी पार्कवर येत होते.
यावेळी राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग पुन्हा एकदा केला. २०१४ मध्ये अदानी उद्योग समूहाकडे काय होते आणि आज किती उद्योग त्यांच्याकडे आहे, महाराष्ट्रात २०१४ ला त्यांच्याकडे काय होते आणि आज काय आहे? याचे विस्तृत प्रेझेंटेशन त्यांनी यावेळी केले. हे बघूनही जर तुम्ही जागे होणार नसाल तर मराठी माणसाची ही शेवटची निवडणूक ठरेल. आज चुकलात तर उद्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, पुणे, नाशिकसह सर्वच शहरांचे अस्तित्व धोक्यात येईल. वाढवण बंदराच्या माध्यमातून आधी पालघर, ठाणे आणि त्यानंतर मुंबई पालिकेच्या माध्यमातून मुंबई गुजरातला जोडण्याचा कट रचला जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सायंकाळी ६.५० वाजता दाखल झाले. राज ठाकरे यांच्या घरून राज आणि उद्धव ठाकरे यांचा ताफा एक तासाने रात्री ८ वाजता निघाला आणि सभास्थळी पोहोचला. दोघे एकत्र आल्याचे पाहून मनसे आणि उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून जल्लोष केला.
दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. यामध्ये महिला, तरुण आणि वृद्धांची संख्या लक्षणीय होती. जल्लोष करणाऱ्यांमध्ये महिला कार्यकर्त्याही आघाडीवर होत्या. मराठवाडा आणि पुण्यातूनही मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवाजी पार्कवर एकत्र आल्यानंतर कार्यकर्त्यांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला.
ठाकरे बंधूंच्या सभेला मुंबई बाहेरून येणाऱ्या कार्यकर्त्यांनी लोकल आणि मेट्रोने प्रवासाचा पर्याय निवडला. संध्याकाळी दादर स्टेशन परिसरात कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली असून जोरदार घोषणाबाजी सुरू होती.
दोघे बंधू स्वतःच्या जीवावर मुंबई वाचविण्यास लढत आहेत
साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली त्याचा राग अजूनही काहींच्या मनात आहे, हे विसरू नका. बाहेरचे इथे येऊन प्रचार करताहेत, पण दोघे बंधू स्वतःच्या जीवावर मुंबई वाचविण्यासाठी लढत आहेत. त्यात आमची कायम साथ असेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जयंत पाटील यांनी व्यक्त केला.