Join us
Daily Top 2Weekly Top 5

"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 11:21 IST

BJP Criticize Uddhav Thackeray: हिंदी सक्तीचा जीआर रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मराठीवरील प्रेमावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं मराठीवरील प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका केली आहे.

महाराष्ट्रामधील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्यासंदर्भात राज्य सरकराने काढलेला शासन आदेश रद्द करण्यास भाग पाडल्यानंतर आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्ताने आपापसातील मतभेद मिटवून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर पहिल्यांदाच सार्वजनिकरीत्या एकाच मंचावर येत आहेत. तसेच आता ठाकरे गट आणि मनसे यांच्यात राजकीय मनोमिलन होण्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आज आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या पार्श्वभूमीवर भाजपाने मराठीवरील प्रेमावरून उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. तसेच उद्धव ठाकरे यांचं मराठीवरील प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका केली आहे.

या संदर्भात भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्या केशव उपाध्ये यांनी लिहिलं आहे की,  उद्धव ठाकरे यांनी मराठी सक्तीच्या जीआरची होळी करण्याचा आदेश दिला आहे. मराठी सक्ती सांगणाऱ्या जीआरची होळी? हे यांचं मराठी प्रेम म्हणायचं का? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उर्दू भवनची घोषणा केली, त्यावेळी मराठी शाळांच्या दुरावस्थेची आठवण आली नाही? असे सवाल उपाध्ये यांनी विचारले आहेत.

या पोस्टमध्ये उपाध्ये पुढे लिहितात की, मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना वर्षानुवर्षे सत्तेवर होती. मुंबई महापालिकेच्या मराठी शाळांची संख्या गेल्या १५ वर्षात ४०० वरून २८० पर्यंत खाली आली. याच शाळांतील विद्यार्थी संख्याही लाखांहून ३५ हजारांवर आली. काही शाळा बंद कराव्या लागत आहेत. कुठे गेलं उद्धव ठाकरे यांचं मराठी प्रेम?

याच पोस्टमधून केशव उपाध्ये यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला टोला लगावला आहे. त्यात ते म्हणतात की, शरद पवार गटाने २०२० मध्ये हिंदी भाषा जोडो अभियान केले होते, त्याचं उद्धाटन जयंत पाटील यांनी केले होते. आता ते हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होत आहेत.

टॅग्स :मराठीहिंदीभाजपाउद्धव ठाकरे