हा ठाकरेंचा शब्द असून, तो लोकांसमोर न्यायचा आहे; आदित्य, अमित यांचे उमेदवारांसमोर मुंबईच्या योजनांचे सादरीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 12:06 IST2026-01-03T12:05:36+5:302026-01-03T12:06:21+5:30
आ. आदित्य म्हणाले की, सगळ्या उमेदवारांनी जिंकून पुन्हा १६ तारखेला यायचे आहे. तिन्ही पक्षांचे समीकरण जुळले आहे. मुंबईकरांचे तन व मन आपल्याकडे आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन, धमक्या आल्या. मात्र, आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत.

हा ठाकरेंचा शब्द असून, तो लोकांसमोर न्यायचा आहे; आदित्य, अमित यांचे उमेदवारांसमोर मुंबईच्या योजनांचे सादरीकरण
मुंबई : मुंबईतील जमिनी मुंबईकरांच्या घरांसाठीच, वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजना, घरकाम करणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये सन्मान निधी अशा विविध १५ योजनांचे सादरीकरण उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे व मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी उद्धवसेना भवनात शुक्रवारी उद्धवसेना, मनसे व राष्ट्रवादी (शरद पवार) उमेदवारांसमोर केले. हा वचननामा नसून जिंकून आल्यानंतर महापौरांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी हे सर्व करून दाखवायचे आहे. हा ठाकरेंचा शब्द असून, तो लोकांसमोर न्यायचा आहे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
आ. आदित्य म्हणाले की, सगळ्या उमेदवारांनी जिंकून पुन्हा १६ तारखेला यायचे आहे. तिन्ही पक्षांचे समीकरण जुळले आहे. मुंबईकरांचे तन व मन आपल्याकडे आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी मागे घेण्यासाठी फोन, धमक्या आल्या. मात्र, आपण एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत.
‘एबी फॉर्म गिळला नाही’
या महापालिका निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांचे अभिनंदन करत तुम्हीच निवडून आलात म्हणजे मी निवडून आलो. तिकीट न मिळालेल्या काही सहकाऱ्यांनी समजूतदारपणा दाखवून अर्ज मागे घेतले आहेत. त्यांचे आभार आहेतच; पण आमच्यातील कुणीही एबी फॉर्म गिळला. हाच आपल्यात फरक आहे, हीच आपली निष्ठा आहे, असा टोला अमित ठाकरे यांनी विरोधकांना लगावला.
सादरीकरणातील मुद्दे -
पालिकेचे गृहनिर्माण प्राधिकरण करून ५ वर्षांत १ लाख परवडणारी घरे देणार
बेस्ट तिकीट दरवाढ कमी ५-१०-१५-२० असा दर ठेवणार, जुने मार्ग सुरू करणार
मुंबईत नवी पाच वैद्यकीय महाविद्यालये
ज्येष्ठांसाठी हेल्थ केअर कंट्रोल रूम व पालिकेची स्वतःची रुग्णवाहिका सेवा
महापालिकेचे अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उभारणार