दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!

By अतुल कुलकर्णी | Updated: July 7, 2025 05:23 IST2025-07-07T05:22:03+5:302025-07-07T05:23:54+5:30

वीस वर्षांनंतर दोन ठाकरे एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे खळबळ उडाली, तेव्हा तो क्षण कशा पद्धतीने सेलिब्रेट केला पाहिजे हे कालच्या इव्हेंटवरून प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे.

This is how the two Thackerays came together..! | दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!

दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!

अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

वीस वर्षांनंतर दोन ठाकरे एकत्र आले. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यामुळे खळबळ उडाली, तेव्हा तो क्षण कशा पद्धतीने सेलिब्रेट केला पाहिजे हे कालच्या इव्हेंटवरून प्रत्येकाने शिकण्यासारखे आहे. प्रत्येक गोष्ट प्रॉपर ठरवून केलेली होती. अजित भुरे निवेदन करताना जे बोलत होते तो शब्द न शब्द त्यांनी लिहून आणलेला होता. अगदी उद्धव आणि राज दोघे त्यांच्या घरून निघण्यापासून ते स्टेजवर येईपर्यंतचा प्रत्येक क्षण पद्धतशीरपणे प्लॅनिंग केलेला होता. दोन्ही ठाकरे एकाचवेळी आपापल्या घरून निघाले. एक जण पुढे गेला, एक जण नंतर निघाला, असे झाले नाही. स्टेजच्या मागच्या बाजूला एक ग्रीन रूम तयार केली होती. उद्धव आधी पोहोचले आणि व्हॅनिटी व्हॅनमध्ये जाऊन बसले. त्यांच्या मागेच राज आले. ते ग्रीन रूममध्ये गेले. दोन्ही भावांची पहिली भेट ग्रीन रूममध्ये झाली. स्टेजवर येतानाही प्रेक्षकांकडे चेहरा करत राज उजव्या बाजूने स्टेजवर आले आणि उद्धव डाव्या बाजूने. राज मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ होते. उद्धव महाविकास आघाडीसोबत होते. एक उजव्या बाजूला झुकलेले, तर दुसरे डाव्या पक्षाच्या सोबत सत्तेत सहभागी झालेले. प्रेक्षकांकडे चेहरा करून स्टेजवर येताना राज ठाकरे उजवीकडून, तर उद्धव ठाकरे डावीकडून स्टेजवर आले. हा सूचक योगायोग होता.

दोघेही स्टेजवर येताच पूर्ण सभागृहातील लाइट जातील. लोक आपापल्या मोबाइलच्या बॅटरी सुरू करतील, असे नियोजन केले होते. स्टेजवर चार-पाच पायऱ्या आणि त्याच्या वरती फक्त दोन खुर्च्या. दोघे एकत्र त्या पायऱ्या चढून गेले. बॉडीगार्ड, पीए जवळपासही येणार नाही, याची काळजी घेण्यात आली होती. सभा सुरू होताना पोडियम कुठे ठेवायचा हे देखील मार्क करून देण्यात आले होते. राज भाषण करताना पाठीमागे पूर्णवेळ उद्धव दिसायला हवेत आणि उद्धव भाषण करताना राज पूर्ण वेळ दिसायला हवेत, अशी व्यवस्था होती. प्रत्येक फ्रेममध्ये फक्त दोघे दिसतील, याची पूर्ण काळजी घेतली गेली.

लढाई आता सुरू होईल. दोघांकडेही आज गमावण्यासारखे काहीच नाही. आपण केवळ महापालिका निवडणुकीपुरता विचार करून एकत्र येऊ नये. तर, पुढची लोकसभा, विधानसभेचेही नियोजन करावे. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांतही आपण कसे घुसू शकतो, याचे नियोजन करावे, अशी अट राज ठाकरे यांनी उद्धव यांच्यापुढे ठेवल्याचे समजते. मात्र, आता त्याला अर्थ उरलेला नाही. एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो आहोत इतक्या स्पष्ट शब्दांत उद्धव ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली. मात्र, राज यांनी तेवढा स्पष्टपणा बोलण्यातून दाखवला नाही. पण, जे बाळासाहेबांना जमले नाही ते फडणवीस यांना जमले. त्यांनी आम्हाला एकत्र करून दाखवले, असे सांगून आपण एकत्र आल्याची ग्वाही मात्र राज यांनी दिली. डोळ्यातले अश्रू कधी खोटं बोलत नाहीत. राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पूर्ण वेळ स्टेजच्या मागील बाजूला अत्यंत भावूक होऊन उभ्या होत्या. कार्यक्रम झाल्यानंतर डोळ्यातले अश्रू पुसत त्यांनी आनंदाने सगळ्यांची भेट घेतली. आदित्य आणि अमित यांना एकत्र बघून दोघींच्याही डोळ्यात जे भाव होते ते नाटकी नव्हते.

मनसैनिक आणि शिवसैनिक, तर कधीच एकत्र आले आहेत. आ. अनिल परब आणि बाळा नांदगावकर या दोघांच्या चेहऱ्यावरचे भाव प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनातल्या भावना व्यक्त करत होते. मागे एकदा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वेळेची शिवसेना आता उरली नाही, असे विधान केले होते. त्या एका वाक्याने शिवसैनिक पेटून उठले आणि मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा त्यांनी जिंकून दाखवल्या. आता तर वीस वर्षांपासूनची इच्छा पूर्ण झाली आहे. दोन ठाकरे एकत्र आले आहेत. अशावेळी शिवसैनिक पेटून उठला नाही तरच नवल!

पैसे देऊन माजी नगरसेवक फोडणे आणि त्यांना आपल्या पक्षात घेणे या गोष्टींचा आता लोकांना उबग आला आहे. उद्धव ठाकरे यांना एकटे पाडले गेले, त्या सहानुभूतीचा परिणाम लोकसभा निवडणुकीत झाला. मात्र, भर विधानसभेला तो भर ओसरून गेला. आता पुन्हा दोन्ही ठाकरे एकत्र आल्यामुळे निर्माण झालेला जोश कशा रीतीने परिवर्तित होईल यावर राजकीय गणित अवलंबून आहे.

Web Title: This is how the two Thackerays came together..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.