Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा संघर्षाचा काळ, आजचा दिवस आयुष्यातील एक वेगळे पान; सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 06:46 IST

रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार ईडी कार्यालयाजवळच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित होते.

मुंबई : सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) बजावलेल्या नोटीसनंतर रोहित पवार यांनी चौकशीला सामोरे जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात जाऊन पक्षाचे अध्यक्ष तथा आपले आजोबा शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी पवार यांनी रोहित यांना यशवंतराव चव्हाण यांचे पुस्तक भेट दिले. ईडी कार्यालयात भरपूर वेळ मिळेल तिथे हे पुस्तक वाचून काढ, असा मिश्किल सल्लाही  पवारांनी यावेळी रोहित यांना दिला.

रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवार ईडी कार्यालयाजवळच असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात उपस्थित होते. तर सुप्रिया सुळे यांनी ईडी कार्यालयाच्या प्रवेशद्वारापर्यंत रोहित पवार यांची साथ केली. ईडीच्या प्रवेशद्वारावरच सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना संविधानाची प्रत भेट देत, संघर्ष करण्याचा सल्ला दिला. रोहित पवार यांच्यासोबत आमदार सुनील भुसार आणि संदीप क्षीरसागरही यावेळी उपस्थित होते. ईडी कार्यालयात जाताना त्यांनी जी फाईल बरोबर घेतली होती, त्यावर महापुरुषांचे, समाजसुधारकांचे फोटो लावले होते.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची गर्दी

ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी रोहित पवार यांनी विधानभवनात जाऊन तिथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. तसेच विधानभवनात लावण्यात आलेल्या संविधानाच्या प्रस्तावनेसमोरही ते नतमस्तक झाले. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणा देत ईडीच्या कारवाईचा कार्यकर्ते निषेध करत होते. रोहित पवार ईडी कार्यालयात पोहचले तिथेही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. बॅलॉर्ड पीअर परिसरात ठिकठिकाणी रोहित पवारांचे बॅनर लावण्यात आले होते, त्यावर ‘पळणार नाही तर लढणारा दादा‘ असे त्यावर लिहले होते. तसेच ईडी कार्यालय परिसरात दडपशाहीच्या कारवाईचा निषेध असे लिहिलेले बॅनरही लावण्यात आले होते.

टॅग्स :सुप्रिया सुळेरोहित पवारराष्ट्रवादी काँग्रेस