Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा विनोद समाजावा... गृहनिर्माणमंत्र्यांनी असं का म्हटले, कोणावर टीकास्त्र सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 16:45 IST

नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानी हद्दीत १२४ किलोमीटरवर पडले

मुंबई : भारताचे एक क्षेपणास्त्र चुकीने पाकिस्तानात जाऊन पडल्यामुळे खळबळ उडाली आहे. संरक्षण मंत्रालयाने यास दुजोरा दिला असून, तांत्रिक चुकीने क्षेपणास्त्र डागले गेल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने या घटनेची अतिशय गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आले आहेत, तर पाकिस्तानने या प्रकाराचा तीव्र निषेध केला असून, भारताने उत्तर देण्याची मागणी केली आहे. आता, गहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याप्रकरणी खोचक ट्विट केले आहे. 

प्राप्त माहितीनुसार, ही घटना ९ मार्चला सायंकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास घडली होती. नियमित देखभालीदरम्यान तांत्रिक चुकीमुळे एक क्षेपणास्त्र डागले गेले आणि ते पाकिस्तानी हद्दीत १२४ किलोमीटरवर पडले. त्यावर कोणतीही शस्त्रे किंवा स्फोटके नव्हती. त्यामुळे कोणतीही प्राणहानी झालेली नाही, असे भारतीय लष्कराने म्हटले आहे. मात्र, संरक्षण मंत्रालयाने या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले असून, चौकशीचे आदेश दिले आहेत. याबाबत, जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन हा विनोद समजावा, असे म्हटले आहे. 

भारताचे missile चुकून पाकिस्तानात गेले, हा विनोद समजावा... असे आव्हाड यांनी म्हटले आहे. एकप्रकारे आव्हाड यांनी या ट्विटद्वारे केंद्र सरकारला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे.   दरम्यान, भारताचे एखादे विमान मुलतान भागात मियां चन्नू येथे कोसळल्याच्या बातम्या पाकिस्तानी माध्यमांमध्ये प्रसारित झाल्या होत्या. पाकिस्तानी लष्करानेही या ठिकाणाचा उल्लेख केला हाेता. या घटनेमुळे काही इमारतींचे नुकसान झाले. क्षेपणास्त्र डागले गेले त्यावेळी भारत आणि पाकिस्तानी हवाई हद्दीत अनेक प्रवासी विमाने होती. क्षेपणास्त्र ४० हजार फूट उंचीवर होते, तर विमाने ३५ ते ४२ हजार फूट उंचीवर होती. त्यामुळे मोठ्या अपघाताचीही शक्यता होती.

ते क्षेपणास्त्र ब्रह्मोस असल्याचा दावा

क्षेपणास्त्र कोणते होते, याबाबत भारताने कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु, जे क्षेपणास्त्र पाकिस्तानात पडले ते सुपरसॉनिक क्षेपणास्त्र ‘ब्रह्मोस’ असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हे जगातील सर्वात वेगवान क्षेपणास्त्र असून त्याचा ताशी २५०० किलोमीटर वेग आहे. याचा साठा राजस्थानातील श्रीगंगानगर येथे ठेवण्यात आला आहे. परंतु, ते सिरसा येथून डागण्यात आल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. ब्रह्मोस भेदणे अशक्य असल्यामुळे पाकिस्तानला धडकी भरली आहे. 

 

टॅग्स :जितेंद्र आव्हाडभारतपाकिस्तानब्राह्मोस