Join us  

"हे डोकं शिंदेंचं नाही, भाजपचं कारस्थान"; शिंदेंवर निशाणा भाजपवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2022 10:12 AM

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे सांगत शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तुतारी फुंकली आहे.

मुंबई - राज्यातील बंडखोरीनंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. मात्र, हा बंड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मान्य नसल्याने शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. आता, शिवसेना विरुद्ध शिवसेना असाच सामना राज्यात रंगला आहे. एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानतंर आता कायदेशीरपणे शिवसेना पक्षावर ताबा मिळवण्याची तयारी सुरु केली आहे. तर, शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावाही आमचाच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचं नाव घेऊन सध्या शिंदे गटाचं राजकारण सुरू आहे. आता, शिवसेनेनं रोखठोकमधून एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. तसेच, भाजपवरही गंभीर आरोप केले आहेत. शिवसेनेवर दावा सांगण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न हे एकनाथ शिंदेंचं डोकं नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आहोत, असे सांगत शिंदे गटाने दसरा मेळाव्याची तुतारी फुंकली आहे. तर, शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हाच परंपरेचा आणि खऱ्या शिवसेनेचा असल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात येत आहे. यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. एकीकडे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि दुसरीकडे आनंद दिघे यांच्या नावाने शिंदे गट हिंदुत्त्वाचा वसा जपत आम्हीच हा वारसा पुढे नेत असल्याचं सांगतोय. शिवसेना पक्षावरुन, शिवेसना पक्षाच्या चिन्हावरुन आता कायदेशीर लढाई सुरु आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगानेच निर्णय घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयानेही स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आता लवकरच याप्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल. मात्र, या वादावरुन शिवसेनेनं शिंदे गटावर कडाडून टिका केली. तसेच, हे डोकं शिंदेंचं नसून भाजपचं कारस्थान असल्याचा आरोपही शिवसेनेनं केला आहे. 

हे डोकं शिंदेंच नाही, भाजपचं कारस्थान

सण-उत्सवांच्या मोसमात महाराष्ट्राचे वातावरण आणि राजकारण कमालीचे गढूळ झाले आहे. शिवसेनेत मोठी फूट पाडून एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. इथपर्यंत ठीक, पण त्यांनी सरळ शिवसेनेवरच दावा सांगितला. हे डोके शिंदे यांचे नाही. त्यामागे भारतीय जनता पक्षाचे मोठे कारस्थान आहे. छगन भुजबळ, नारायण राणे व राज ठाकरे यांनी बंड केले किंवा पक्ष सोडला, पण शिवसेनेवरच दावा सांगण्याचा उद्दामपणा यापैकी कोणीच केला नव्हता. हा उद्दामपणा भाजपच्या पाठिंब्यातून निर्माण झाला. आमचीच शिवसेना व आमचाच दसरा मेळावा. 

सगळेच दिघे नसतात, काहीजण शिंदेही असतात

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे कवित्व सुरू आहे. शिवतीर्थावरचा मेळावाच खरा हे देश जाणतो, पण शिंदे गट त्यांचीच शिवसेना खरी असे मानून दुसरा मेळावा घेत आहे. या क्षणी दिल्लीस आनंदाच्या उकळ्या फुटत असतील. पुन्हा आनंद दिघे यांच्या नावाने हे खेळ सुरू आहेत. राजकारणात सगळ्यांनाच 'दिघे' होता येत नाही. काही जण 'शिंदे' होतात… दिघे नक्की कोण होते? त्यावर प्रकाशझोत टाकणारे खळबळजनक रोखठोक, असे म्हणत सामनाच्या रोखठोकमधून शिंदेंना टोला लगावण्यात आला आहे. महाराष्ट्रात उभी फूट पाडण्यासाठी शिंदे यांनी आज हयात नसलेल्या स्व. आनंद दिघे यांचा आधार घेतला. दिघे यांची आठवण शिंदे यांना 21 वर्षांनंतर झाली. दिघे यांच्या आपण किती निकट होतो हे दाखविण्यासाठी शिंदे यांनी काही कोटी खर्च करून 'धर्मवीर' सिनेमा काढला. सिनेमावर खर्च झाला त्यापेक्षा जास्त खर्च सिनेमाच्या म्हणजे स्वतःच्या प्रसिद्धीवर केला. हा सिनेमा आनंद दिघे यांच्यावर होता की शिंद्यांवर, असा प्रश्न हा सिनेमा पाहून अनेकांना पडला. कारण या सिनेमाचे प्रयोग सुरू असतानाच शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या पाठीत खंजीर खुपसला व शिवसेना फोडली. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून टीव्हीवर या सिनेमाचा भडीमार सुरू आहे तो फक्त शिंदे यांच्या प्रसिद्धीसाठी. या चित्रपटाद्वारे दिघे यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हेच एक अद्भुत व्यक्तिमत्त्व असल्याचे दाखविण्यात आले. चित्रपटातील अनेक प्रसंग म्हणजे कथोकल्पित, कल्पनाविलास यांचे टोक आहे. या चित्रपटानंतर शिंदे यांनी आनंद दिघे यांची ढाल पुढे करून शिवसेना फोडली! 

टॅग्स :उद्धव ठाकरेएकनाथ शिंदेशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीस