१२ जानेवारीला सुरू होणार 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव'

By संजय घावरे | Published: January 1, 2024 06:41 PM2024-01-01T18:41:22+5:302024-01-01T18:42:58+5:30

मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त 'सिंहावलोकन'

'Third Eye Asian Film Festival' to start on January 12 | १२ जानेवारीला सुरू होणार 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव'

१२ जानेवारीला सुरू होणार 'थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव'

मुंबई - महाराष्ट्रातील चित्रपट संस्कृतीचा मानदंड असणारा २० वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १२ जानेवारी ते १८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबई आणि ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवासाठी निवडलेले चित्रपट माहिममधील सिटीलाइट सिनेमा  आणि कांदिवलीतील ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्समध्ये दाखवले जाणार आहेत.

थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे हे २०वे वर्ष असून, यात आशियाई स्पेक्ट्रम विभागात इंडोनेशिया, इजिप्त, नेपाळ, बांगलादेश, मलेशिया आणि श्रीलंकेतील १२ चित्रपटांचा समावेश करण्यात आला आहे. कंट्री फोकस विभागात इराणमधील सात चित्रपट दाखवले जातील. आशियाई चित्रपटांबरोबरच भारतीय चित्रपट आणि मराठी चित्रपटांचा स्पर्धा विभाग या महोत्सवाचे आकर्षण ठरणार आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी, मराठी भाषांमधील १२ चित्रपटांचा समावेश आहे.

यात 'फॅमिली', 'डीप फ्रीझ', 'बिजया पोरे', 'या गोष्टीला नावच नाही', 'आत्मपॅम्पलेट', 'हाऊस ऑफ कार्डस', 'एपिसोड १३', 'सेयुज सनधन', 'आरोह एक प्रितिभी', 'मिनी', 'विस्पर्स ऑफ फायर अँड वॉटर', 'गोराई पाखरी' या १२ चित्रपटांचा समावेश आहे. मराठी स्पर्धा विभागात जयंत सोमाळकर दिग्दर्शित 'स्थळ', दिग्दर्शक निलेश  कुंजीरचा 'रघुवीर', केदार शिंदे दिग्दर्शित 'महाराष्ट्र शाहीर', संतोष कोल्हे यांचा 'स ला ते स ला ना ते', तानाजी गाडगे दिग्दर्शित 'जित्राब', दिग्दर्शक कविता दातीर, अमित सोनावणे यांचा 'गिरकी', अनुप जत्राटकर यांचा 'गाभ',  सचिन श्रीराम दिग्दर्शित 'टेरिटरी',  मंगेश बदार यांचा 'मदार' हे नऊ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

सुप्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक मृणाल सेन यांच्या जन्मशताब्दी निमित्त या महोत्सवात त्यांच्या चित्रपटांचा 'सिंहावलोकन' विभाग असणार आहे. सुधीर नांदगावकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ यावर्षी चित्रपट लेखनाचा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. महोत्सवादरम्यान चित्रपट प्रदर्शनासोबतच ज्युरी सदस्यांबरोबर ओपन फोरम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांसह मास्टर क्लासचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची प्रतिनिधी नोंदणी ५ जानेवारीपासून सुरू होत असून, महोत्सवाच्या संकेतस्थळावरूनही नोंदणी करता येईल.

Web Title: 'Third Eye Asian Film Festival' to start on January 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.