उद्या लोकलने प्रवास करण्यापूर्वी विचार करा; उपनगरीय रेल्वे मार्गांवर दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 12:08 IST2025-10-04T12:07:30+5:302025-10-04T12:08:06+5:30
मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत ब्लॉक असणार आहे.

उद्या लोकलने प्रवास करण्यापूर्वी विचार करा; उपनगरीय रेल्वे मार्गांवर दुरुस्तीसाठी मेगाब्लॉक
मुंबई : रविवार ५ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेमार्गावरून प्रवास करताना जरा विचार करा. मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड स्थानकांदरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक सकाळी ११:०५ ते दुपारी ३:५५ पर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान अप-डाउन धिम्या मार्गावरील लोकलची वाहतूक जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहे. परिणामी लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावणार प्रवासात गर्दीचा सामना करावा लागू शकतो.
हार्बर मार्गावर वाशी ते पनवेल स्थानकांदरम्यान अप-डाउन मार्गावर सकाळी ११:०५ ते दुपारी ४:०५ वाजेपर्यत दुरुस्ती करण्यात येणार आहे. परिणामी वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल वाहतूक बंद राहणार आहे. ब्लॉक काळात सीएसएमटी-वाशी मार्गावर स्पेशल लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी-नेरुळ दरम्यान लोकल सुरू राहणार आहे.
तांत्रिक कामासाठी शनिवारी रात्री ब्लॉक
भायखळा स्टेशनवर ट्रेनचा वेग वाढवण्यासाठी शनिवार रात्री विशेष ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक परळ ते भायखळा दरम्यान अप जलद मार्गावर रात्री १२:३० ते पहाटे ४:३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉकदरम्यान भुवनेश्वर - सीएसएमटी कोणार्क एक्सप्रेस आणि हावडा-सीएसएमटी एक्सप्रेस दादर स्थानकापर्यंतच चालवण्यात येणार आहे. तसेच लाेकलच्या वेळापत्रकावरही परिणाम हाेण्याची शक्यता आहे. गाड्या वेळेवर धावणार नसल्याने प्रवाशांचा खाेळंबा हाेण्याची शक्यता आहे.