चोराने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:27 IST2018-09-12T05:27:38+5:302018-09-12T05:27:47+5:30

लुटीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने घरात एकट्या असलेल्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला.

Thieves raped minor girl | चोराने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

चोराने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

मुंबई : लुटीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या चोराने घरात एकट्या असलेल्या १२ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे चे हातपाय बांधून चाकूच्या धाकाने घरातील दागिने, पैसे चोरी करून पळ काढला. या प्रकरणी बीकेसी पोलिसांनी पॉक्सो, बलात्कार, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
बीकेसी परिसरात १२ वर्षीय नेहा (नावात बदल) आईवडील आणि लहान भावासोबत राहते. सोमवारी वडील कामानिमित्त बाहेर गेले होते, तर आई नेहाच्या भावासह बाहेर गेली होती. नेहा घरात एकटीच होती. याच दरम्यान घरात घुसलेल्या चोराने चाकूच्या धाकाने घरातील ऐवजावर डल्ला मारला. त्यानंतर नेहावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने पळून जाऊ नये यासाठी तिचे हातपाय बांधून ठेवले व घरातील सर्व ऐवज घेऊन तो पसार झाला.
घरी परतलेल्या आईला नेहा रडताना दिसली. ती काहीही बोलायला तयार नव्हती. आईला आपुलकीने विचारल्यानंतर तिच्याकडून घडलेला प्रसंग आईला समजला. त्यानंतर आईने नेहाला घेऊन थेट बीकेसी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी इसमाविरुद्ध पॉक्सो, बलात्कार, जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. नेहाला मानसिक धक्का बसला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Thieves raped minor girl