मुंबई : पक्षात येण्यापूर्वी त्यांना आरक्षण हवे असते; पण जरा कुठे वाजले तर आरक्षण देऊनही लोक डबे बदलतात, गाड्या बदलतात. उद्दिष्टाचे रूळ नसलेले कधी या, तर कधी त्या फलाटावर जात आहेत, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षबदलूंवर गुरुवारी केली. दादर येथे रेल्वे कामगार सेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये ते बोलत होते.
रेल्वेचे महत्त्व ओळखून पूर्वी वेगळा अर्थसंकल्प मांडला जात होता; पण तोही मुख्य अर्थसंकल्पात विलीन केला. भाजप सरकारने एक-एक संस्था मारून टाकण्याचे काम सुरू केले आहे. कोकण रेल्वे ही भारतीय रेल्वेत सामावून घेण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यांची ही मनमानी चालणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे महाराजांचा पुतळा अजूनही बसविलेला नाही. त्यामुळे आता प्रशासनाला अखेरची तारीख देऊ. त्या वेळेत पुतळा बसवला नाही तर आम्ही तो बसवू, असा इशारा ठाकरे यांनी दिला.