"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2026 09:13 IST2026-01-09T08:55:30+5:302026-01-09T09:13:23+5:30
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यावरुन राज ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.

"सगळ्या योजना आखल्या पण याची कधी अपेक्षाच केली नाही"; ठाकरे बंधुंच्या युतीवर राज ठाकरेंचा पलटवार
Raj Thackeray: महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकामागून एक धक्के बसत असून, सत्ताधारी महायुतीमध्येही काही प्रमाणात वाद पाहायला मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार महायुतीत असूनही काही ठिकाणी आगामी निवडणूक स्वतंत्रपणे लढत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अजित पवार यांनी भाजपच्या भ्रष्टाचारावर थेट हल्ला चढवल्याने युतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. या घडामोडींवर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अत्यंत टोकदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि संजय राऊत यांनी घेतलेल्या या विशेष मुलाखतीत राज आणि उद्धव ठाकरे बोलत होते. अजित पवारांच्या भूमिकेवर बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला. "भाजपने एकनाथ शिंदे यांचा वापर केवळ मतं फोडण्यासाठी केला," असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. मित्रपक्षांना संपवून आपली सत्ता प्रस्थापित करणे हेच भाजपचे धोरण असल्याचे सांगत त्यांनी महायुतीमधील अस्वस्थतेवर बोट ठेवले.
"ही त्यांची नुरा कुस्ती सुरू आहे. विरोधी पक्षाला तुम्ही स्पेस ठेवायची नाही, एकमेकांवर आरोप करायचे आणि निवडून आल्यावर एकत्र यायचं. आम्ही एकत्र आलेलो असताना एकनाथ शिंदे यांना मुंबई, ठाण्यात मराठी मतं फोडण्यासाठी ते वापरत आहेत. म्हणूनच त्यांना शिवसेना आणि आमचं चिन्ह दिले आहे. मराठी माणसात फूट पाडायची, मराठी माणसे फोडायची हे एकनाथ शिंदेंना दिलेले काम आहे. पण आम्ही एकत्र आल्याने हे काम असफल झाले आहे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही एकत्र येणार हे त्यांना अपेक्षित नव्हतं – राज ठाकरे
दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका विशेष मुलाखतीत सत्ताधाऱ्यांवर कडाडून टीका केली. "त्यांनी सगळ्या योजना आखल्या. पण हे कधी होईल अशी त्यांनी अपेक्षा कधी केली नव्हती," असं राज ठाकरे म्हणाले. त्यामुळेच आता त्यांची समीकरणं बिघडल्याचे म्हटले.
'आज मुंबईची संपूर्ण संपत्ती ही मराठी माणसाच्या हाती नाही, आज मुंबईची संपत्ती ही विशिष्ट वर्गाकडे असून ती सातत्यानं गुजरातला पळवण्याचा प्रयत्न होत आहे, याचा अर्थ असा की मुंबईचा जमिनीचा तुकडा तुमच्याकडे मात्र संपत्ती आमच्याकडे? आताचं विमानतळ हे अदानींकडे आहेच. या विमानतळाचं साधारण क्षेत्रफळ पाहिल्यास त्यामध्ये कमीत कमी ५० शिवाजी पार्क मैदानं बसतील इतकं मोठं ते क्षेत्रफळ आहे. उद्या हे सगळं नवी मुंबईकडे वळवायचं आणि जुनं विमानतळ, त्यासह हा संपूर्ण भाग विकायला काढायचा. हे सर्व मोदी आल्यानंतर झालं. अदानी आणि अंबानी यांच्यातील महत्त्वाचा फरक म्हणजे, मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते. पण, अदानी मात्र मोदी मोठे झाल्यावरच मोठे झाले आहेत. अदानींचा विस्तार मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे," असेही राज ठाकरे म्हणाले.