Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्याशिवाय देवेंद्रजी पिकनिकला जाऊ शकत नाही"; दावोसवरुन अमृता फडणवीसांचा राऊतांना मिश्किल टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:22 IST

दावोस दौरा पिकनिक नसून महाराष्ट्राच्या विकासाचा प्लॅटफॉर्म असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.

Amruta Fadnavis on Sanjay Raut: मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र डागलं होतं. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सरकारने दावोसला जाऊन महाराष्ट्रातील मंत्र्याच्याच कंपनीसोबत करार केल्याची आरोप देखील करण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्यावर पिकनिक म्हणून टीका केली होती. त्यावर आता अमृता फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री पिकनिकसाठी दावोसला गेले नसल्याचा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला.

संजय राऊतांच्या टीकेचा समाचार

खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांच्या दावोस दौऱ्याला 'जनतेच्या पैशावर सुरू असलेली पिकनिक' असे संबोधले होते. या टीकेला उत्तर देताना अमृता फडणवीस यांनी आपल्या खास शैलीत टोला लगावला. मुख्यमंत्री दावोसला पिकनिकसाठी गेलेले नाहीत. महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणण्यासाठी आणि राज्याला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेले असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.

"देवेंद्र फडणवीस हे दावोसमध्ये महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेले आहेत. त्यामध्ये तिथे अनेक करार केले जात आहेत. वेगवेगळ्या देशांच्या लोकांना भेटत आहेत. तिथे व्यवसायासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यांचा तीन दिवसांचा दौरा आहे. मला नाही वाटत ते माझ्याशिवाय किंवा मुलीशिवाय पिकनिकला जाऊ शकतात. ते कामासाठी एक शिष्टमंडळ घेऊन गेले आहेत. यातून मोठी गुंतवणूक येणार असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे," असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं.

विकासाच्या मुद्द्यावरून विरोधकांना सल्ला

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे जागतिक व्यापाराचे केंद्र आहे आणि तिथे राज्याचे प्रतिनिधित्व करणे हे मुख्यमंत्र्यांचे कर्तव्य असल्याचे अमृता फडणवीस यांनी नमूद केले.

दरम्यान, आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाच्या खुर्चीकडे लागले आहे. मुंबईचा महापौर मराठी असेल की अमराठी अशा चर्चांना उधाण आले असतानाच, अमृता फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल आणि तो मराठी माणूसच असेल, असेल असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Amruta Fadnavis mocks Raut: Devendraji can't picnic without me.

Web Summary : Amruta Fadnavis responded to Sanjay Raut's criticism of Devendra Fadnavis's Davos trip. She stated that he went to Davos to attract investment and create global opportunities for Maharashtra, not for a picnic. She also emphasized the importance of the visit for job creation.
टॅग्स :देवेंद्र फडणवीसअमृता फडणवीससंजय राऊतस्वित्झर्लंड