Join us  

महाराष्ट्रात लवकरच स्थिर सरकार येईल; पवारांच्या भेटीनंतर संजय राऊत यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 8:48 PM

शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचवल्या होत्या.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँगेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितल्याने सगळ्यांच्या भुवया उंचवल्या होत्या. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तात्काळ शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत काय चाललंय यावर मी कसं बोलणार? राष्ट्रपती राजवट दूर करण्यासाठी आमचे सगळ्यांचे एकमत असून राज्यात स्थिर सरकार येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

संजय राऊत शरद पवारांच्या भेटीनंतर म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशा परिस्थितीत राष्ट्रपती राजवट असल्याने सर्वपक्षीय शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत बोलणी करण्यासंर्दभात शरद पवरांसोबत चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे सत्तास्थापनेबाबत शरद पवारांनी सोनिया गांधींशी चर्चा केली नसेल तर मी कसं त्यांना विचारु?, मात्र लवकरच शिवसेनेच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होईल असा विश्वास देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत बैठक होती. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चाच झाली नाही असं सांगत शरद पवारांनी शिवसेनेला पुन्हा गॅसवर ठेवलं आहे. 

शरद पवार म्हणाले की, सोनिया गांधी यांच्यासोबत आमची बैठक झाली. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अहमद पटेलदेखील उपस्थित होते. ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल. याबाबत पक्षातील नेत्यांची मतं जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असं त्यांनी सांगितले. 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाभाजपादेवेंद्र फडणवीसशरद पवारसोनिया गांधीकाँग्रेस