थंडीसोबत पाऊसही पडणार, 'असं' असणार हवामान
By सचिन लुंगसे | Updated: February 6, 2024 18:04 IST2024-02-06T18:02:47+5:302024-02-06T18:04:13+5:30
९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

थंडीसोबत पाऊसही पडणार, 'असं' असणार हवामान
मुंबई : मध्य भारतात थंडीबरोबर, विदर्भालगतच्या छत्तीसगड व ओरिसा राज्यादरम्यान, हवेचे उच्च दाब क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे हवामानात बदल होत असून १२ फेब्रुवारी पर्यंत विदर्भातील काही जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सोबत मराठवाड्यासह खान्देशातील काही जिल्ह्यात हवामान ढगाळ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. तर कोकणातील हवामानात फार काही बदल होणार नसून आता पडलेली थंडी कायम राहणार आहे.
९ ते १२ फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण विदर्भातील ११ जिल्ह्यात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशिम या ५ जिल्ह्यात १०-११ फेब्रुवारी रोजी पावसाची शक्यता अधिक आहे. शुक्रवार ते सोमवार या काळात मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात ढगाळ वातावरणच राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. नांदेड, हिंगोली, परभणी या ३ जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे.
मुंबईसह कोकणातील ७ जिल्हे व खान्देश वगळता मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यात आकाश निरभ्रच राहील. येथे सध्या जी थंडी पडत आहे, तशीच थंडी जाणवणार आहे. खान्देशातील नंदुरबार, धुळे, जळगाव या ३ जिल्ह्यात पावसाची शक्यता कमीच असुन तेथे मात्र ढगाळ वातावरण राहू शकते. त्यामुळे त्या २-३ दिवसात तेथील थंडीवर परिणाम होवून, थंडी काहीशी कमी होईल, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.