Join us

"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 12:59 IST

मराठी माणूसही आमच्यासोबत आहेत, गैरमराठीही सोबत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आम्ही चांगले काम करू तोपर्यंत लोक आम्हाला मतदान करतील असं त्यांनी सांगितले. 

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. जगातील सर्वात श्रीमंत महापालिका असणाऱ्या मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी चढाओढ सुरू झाली आहे. त्यात प्रादेशिक अस्मिता आणि मराठी भाषिक यावरून ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्र येताना दिसून येत आहे. त्यामुळे मराठी माणसांच्या मतांचा फटका भाजपाला बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. परंतु मराठी मतांच्या टक्केवारीवरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरे मराठी असले तर मी कुठे पंजाबी, गुजराती आहे, मीदेखील मराठी आहे. माझ्याही पक्षाचा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आहेत. ते कुठे गुजरातमधून, आंध्र प्रदेशातून आले आहेत, त्यामुळे मराठी मतांची कुणाची मक्तेदारी नाही. आम्ही चांगले काम केले म्हणून लोकांनी आम्हाला मागच्या वेळी मतदान केले आणि आजही केले. मराठी माणूसही आमच्यासोबत आहेत, गैरमराठीही सोबत आहेत. त्यामुळे जोपर्यंत आम्ही चांगले काम करू तोपर्यंत लोक आम्हाला मतदान करतील असं त्यांनी सांगितले. 

त्याशिवाय राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युतीवरूनही फडणवीसांनी भाष्य केले. आता आमची युती भाजपा-खरी शिवसेना-खरी राष्ट्रवादी यांच्याशी आहे. त्याव्यतिरिक्त आमची युती नाही. समजा, कुणी आमच्यासोबत येत असेल आणि आम्ही सर्वांनी मिळून ठरवले घ्यायचे आहे तर आम्ही स्वागत करू. पण अजून कुठलाही निर्णय आम्ही केला नाही असं फडणवीसांनी सांगितले.  न्यूज १८ लोकमतच्या कार्यक्रमातील मुलाखतीत फडणवीसांनी हे म्हटलं. 

"...तेव्हा आमचा महापौर बनला असता"

दरम्यान, २०१७ साली आमच्याकडे मुंबईत महापौर बनवण्याची संधी होती. जवळपास आम्ही तशी संख्याबळाची जुळवाजुळवही केली होती. परंतु उद्धव ठाकरे यांच्याकडून ३-४ लोक आमच्याशी बोलले. आमच्याकरता हा भावनिक विषय आहे त्यामुळे ते सोडून द्या असं सांगितले. त्यावेळी आम्हीही विचार केला, एका मोठ्या हेतूने आपण काम करतोय, तेव्हा आम्ही महापौर पदच सोडले नाही तर सगळी पदे तुम्ही घ्या आणि तुम्ही महापालिका चालवा. आम्ही महापालिकेत पहारेदाराचे काम करू. जर त्यावेळी मनात आणले असते तर १०० टक्के मुंबई महापालिकेवर आमचा महापौर बनला असता, पण राजकारणात जर-तर याला काही अर्थ नसतो असा खुलासाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज ठाकरेमुंबई महानगरपालिकाउद्धव ठाकरेभाजपा