Join us

तुम्ही UPA चं नेतृत्व करणार?; स्वत: शरद पवारांनी दिली महत्वाची माहिती

By मुकेश चव्हाण | Updated: December 10, 2020 21:13 IST

शरद पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली होती.

मुंबई/ नवी दिल्ली: दिल्लीत सध्या शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तापलं आहे. केंद्राने नव्याने केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेतले जावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. या आंदोलनाला सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला आहे. याचपार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यादरम्यान शरद पवार युपीएतील विविध पक्षांच्या नेत्यांची त्यांनी भेट घेतली आहे. 

दिल्लीत सध्या शरद पवार हे केंद्रस्थानी असतानाच शरद पवारांकडे विरोधी पक्षांचं म्हणजेच युपीएचं नेतृत्व दिलं जाऊ शकतं, अशी चर्चा रंगू लागली होती. शरद पवार यांच्याकडे युपीएच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याचे सांगितले जात होते. दोन दिवसांनी शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यावेळी, यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र ''मी यूपीएचं नेतृत्व करणार या बातमीत तथ्य नाही'', असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तावाहिनीशी बोलताना दिले आहे. 

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या जागी शरद पवारांची वर्णी लागणार असल्याचे दिसून येते. महाराष्ट्रात शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे, केंद्रीय राजकारणातही शरद पवारांकडे नेतृत्व देत भाजपाला आव्हान उभारण्याचा प्रयत्न युपीएतील घटक पक्षांचा आहे. त्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर विरोधकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

भाजपाविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्या नावाचा विचार होत असल्याचे सांगण्यात येत होते. देशात राजकीय पर्याय उभा करण्यासाठी गांधी कुटुंब एक पाऊल मागे घेणार, अशी चर्चा होती. केंद्रात विरोधी पक्षनेते म्हणून शरद पवार यांनी याआधीही काम केले आहे. सध्या देशातील विविध राज्यांत भाजपाचे वाढलेले वर्चस्व आणि युपीएची कमी आक्रमकता लक्षात घेऊन हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र शरद पवारांनी या बातम्यात काही तथ्य नसल्याचे सांगत सर्व दावे फेटाळून लावले आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचीही निवड रखडली आहे. सध्या सोनिया गांधी यांच्याकडेच काँग्रेसचे आणि युपीएचे नेतृत्व आहे. 

देशाचं नेतृत्व करण्याची शरद पवारांमध्ये क्षमता: संजय राऊत

यूपीएचं अध्यक्षपद आता शरद पवारांकडे देण्याबाबत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं. "शिवसेना यूपीएचा घटक पक्ष नाही. त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा आणि त्याबाबत मी बोलणं योग्य नाही. यूपीएच्या अध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर मी बोलणं योग्य ठरेल", असं संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :शरद पवारराष्ट्रवादी काँग्रेसमहाराष्ट्रकाँग्रेस