Join us

आघाडीमध्ये ‘मनसे’बाबत चर्चाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2019 06:57 IST

अशोक चव्हाण; काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक

सुरेश भुसारी 

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीमध्ये ‘मनसे’च्या सहभागावर चर्चाच झाली नसल्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केल्याने आघाडीमध्ये मनसेच्या सहभागावर पडदा पडला आहे.

काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक गुरुवारी दिल्लीत झाली. तिला ज्योतिरादित्य शिंदे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मल्लिाकार्जुन खरगे, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे, खा. हुसैन दलवाई, नसीम खान, आ. विश्वजीत कदम आदी उपस्थित होते.बैठकीनंतर चव्हाण म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीत जागावाटपावर सहमती असून, २२५ जागांचे वाटप झाले आहे. दोघांकडे समसमान जागा राहतील. उर्वरित ५० ते ६० जागा शेकाप, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपब्लिकन पक्ष, बविआ या आघाडीतील पक्षांना दिल्या जातील. आघाडीमध्ये मनसेला स्थान आहे काय? असे विचारताअशोक चव्हाण म्हणाले की, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये मनसेचा विषयच आला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये मनसे हा विषय आमच्यासाठी संपला आहे. इंदापूरच्या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे. ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात असली तरी शरद पवार यांनी हा मुद्या प्रतिष्ठेचा केला नसून ही जागा पुन्हा हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी सुटणार आह, असेही एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.प्रकाश आंबेडकरांचे स्वागत, पण...वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी काँग्रेस नेत्यांनी तीनवेळा चर्चा केली आहे. परंतु यातून काहीही ठोस बाहेर आलेले नाही. यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा आघाडीत समावेश होणार नसल्याचे स्पष्ट झाले असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईअशोक चव्हाणमनसेराज ठाकरे