पाच जिल्हा परिषदांसाठी महाआघाडीत चर्चा नाही; भाजप सर्वत्र लढणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 00:16 IST2019-12-06T00:16:48+5:302019-12-06T00:16:59+5:30
सत्तेसाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष या पाच जिल्हा परिषदांच्या निमित्ताने एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन राजकीय समीकरण दिसेल.

पाच जिल्हा परिषदांसाठी महाआघाडीत चर्चा नाही; भाजप सर्वत्र लढणार
मुंबई : नागपूर, अकोला, वाशिम, धुळे आणि नंदुरबार या पाच जिल्हा परिषदांची निवडणूक राज्यात सत्तारुढ महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार का याबाबत कुठलीही चर्चा अजून सुरु झालेली नाही. भाजपने मात्र पाचही ठिकाणची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
७ जानेवारीला निवडणूक होणार असून उमेदवारी अर्ज भरण्याचे काम १८ डिसेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत होणार आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, एकत्रितपणे लढण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्या दृष्टीने अद्याप चर्चा सुरू झालेली नाही, पण ती लवकरच होईल, अशी अपेक्षा आहे.
सत्तेसाठी एकत्र आलेले तिन्ही पक्ष या पाच जिल्हा परिषदांच्या निमित्ताने एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नवीन राजकीय समीकरण दिसेल. अंतिम निर्णय विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात किंवा त्याआधी होण्याची शक्यता आहे.
या पाचही जिल्हा परिषदांमध्ये सध्या प्रशासकीय राजवट आहे.
त्या आधी नागपुरात भाजप-शिवसेना, अकोल्यात अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी, वाशीममध्ये काँग्रेस,
धुळ््यात काँग्रेस-राष्ट्रवादी तर नंदुरबारमध्ये काँग्रेसची सत्ता
होती. अकोला आणि वाशिम या
दोन जिल्हा परिषदांमध्ये वंचित
बहुजन आघाडीच्या कामगिरीकडे लक्ष असेल.
भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी सांगितले की, ही निवडणूक लढण्याची तयारी पक्षाने आधीच सुरू केली आहे.