मुंबईत १,१३४ प्रवाशांमागे बेस्टची केवळ एक बस! आतातरी बसेस वाढवणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:40 IST2025-03-25T15:38:50+5:302025-03-25T15:40:58+5:30

बेस्ट उपक्रमाला करारानुसार स्वमालकीच्या किमान ३ हजार ३३७ बसगाड्या ताफ्यात ठेवणे आवश्यक असताना त्यांच्याकडे स्वमालकीच्या केवळ ८१७ बस उरल्या आहेत.

There is only one BEST bus for every 1134 passengers in Mumbai | मुंबईत १,१३४ प्रवाशांमागे बेस्टची केवळ एक बस! आतातरी बसेस वाढवणार का?

मुंबईत १,१३४ प्रवाशांमागे बेस्टची केवळ एक बस! आतातरी बसेस वाढवणार का?

मुंबई

बेस्ट उपक्रमाला करारानुसार स्वमालकीच्या किमान ३ हजार ३३७ बसगाड्या ताफ्यात ठेवणे आवश्यक असताना त्यांच्याकडे स्वमालकीच्या केवळ ८१७ बस उरल्या आहेत. या उलट कंत्राटी बसेसची संख्या जवळपास अडीच पट जास्त म्हणजे २००४ इतकी झाली आहे. त्यातही प्रत्येक महिन्याला बेस्टच्या ५० ते ६० बसगाड्या आयुर्मान संपल्याने भंगारात काढल्या जात आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला ३२ लाख मुंबईकरांच्या दिमतीला प्रति ११३४ प्रवाशांमागे बेस्टची एक बस उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

मुंबईची दुसरी लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेस्टच्या प्रवासी संख्येवर भाडे तत्त्वावरील बसेसचा पुरवठा, त्यातून घडणारे अपघात याचा परिणाम झाला आहे. बसेसच्या घटत्या संख्येमुळे प्रवाशांना तासनतास बस थांब्यावर ताटकळत उभे रहावे लागत आहे. शिवाय वारंवार होणारी आंदोलने, वाहक-चालक यांच्यासोबत होणारे वाद यामुळे प्रवाशांकडून बेस्टऐवजी दुसऱ्या पर्यायांना प्राधान्य दिले जात आहे.

बेस्टची ही परिस्थिती बदलण्यासाठी राज्य शासन, आमदार, खासदार कोणीच पुढाकार घेत नसल्याची टीका बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी केली आहे. अधिवेशनाच्या काळात आमदारांपुढे बेस्टच्या समस्या मांडूनही त्याबद्दल प्रश्न विचारला न गेल्याने सामंत यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सेवेत असलेल्या बसेस
बेस्टच्या बसेस    ८१७    २८.९६ %
कंत्राटी बसेस    २००४    ७१.०४ %
एकूण ताफा    २८२१    १०० %

...म्हणून बसमार्ग बंद
बेस्टच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील बसही येण्यास विलंब होत आहे. गेल्या वर्षी २३ मेला २,१०० इलेक्ट्रिक सिंगल डेकर एसी बस पुरवण्याचे कंत्राट बेस्ट उपक्रमाने निविदा प्रक्रिया राबवून एका मोठ्या कंपनीला दिले होते. यातील सुमारे ४५० बस ताफ्यात आल्या आहेत. त्यातच बसच्या कमतरतेमुळे अल्प प्रतिसाद असलेले मार्ग बंद करून त्यामार्गावरील बस जास्त गर्दीच्या मार्गावर वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या अल्प प्रतिसाद असलेल्या बसमार्गाचा अभ्यास केला जात असून लवकरच यावर अंतिम निर्णय उपक्रमाकडून घेतला जाणार असल्याचे कळत आहे.
 

Web Title: There is only one BEST bus for every 1134 passengers in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.