मुंबई - पक्षात राहून काहीजण फुटीची बिजे पेरत आहेत, त्यांची सर्व माहिती आपल्याकडे आहे. मात्र, अशांना पक्षात थारा देणार नाही. योग्यवेळी त्यांना त्यांची जागा दाखवणार, असा इशारा उद्धव सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. आपल्या पक्षाची हिंदुत्वाची भूमिका लोकांपर्यंत न्या, असेही पदाधिकाऱ्यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव सेनेचा अंधेरीत भव्य मेळावा पार पडल्यानंतर राज्यपातळीवरून सर्वांची मते विचारात घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. शिवसेना भवन येथे आयोजित केलेल्या बैठकीत राज्यभरातील जिल्हाप्रमुख व संपर्कप्रमुख उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त उद्धव सेनेतर्फे शनिवारी मुंबईसह राज्यात तालुका पातळीवर, संविधान आणि भारतमातेच्या संरक्षणासाठी पूजन व मिरवणूक काढत येणार असल्याची माहिती खा. संजय राऊत यांनी दिली.
दावोसमधील गुंतवणूक करार म्हणजे धूळफेकदावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेत १५.७० लाख कोटींची गुंतवणूक आणल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत असले तरी करार झालेल्या ५४ कंपन्यांपैकी ४३ कंपन्या भारतातील आणि ३३ कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे दावोसमधील गुंतवणुकीचा गाजावाजा करणे हास्यास्पद असल्याची अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. दावोस येथील परिषदेत विविध करारांद्वारे १५.७० लाख कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणली असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, दावोस दौऱ्याचा खर्च वाचवून सह्याद्रीत कार्यक्रम करायला हवा होता. कारण, दावोसमध्ये ज्या कंपन्यांसोबत करार झाला, त्या ५४ पैकी ४३ कंपन्या या भारतीय असून त्यात ३३ कंपन्या महाराष्ट्रातीलच आहेत, असे आदित्य म्हणाले.
अमित शाहांवर टीका, एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तरगोरेगाव येथील एका विशेष कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांनी गुरुवारच्या अंधेरीतील सभेतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
अमित शाह मुंबईत येणार असले की, काहींच्या पोटात लगेच मळमळ सुरू होते, वाघनखे काढण्याची भाषा करणाऱ्यांना शाह यांच्या नखाची तरी सर आहे का, वाघनखे काढायची तर त्यासाठी वाघाचे काळीज लागते आणि ते शाहांकडे आहे. ते त्यांनी अनेकदा आपल्या कृतीमधून दाखवून दिले आहे, असे प्रत्त्युत्तर शिंदे यांनी दिले. गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून जळफळाट होत असल्यानेच ठाकरे अशी विधाने करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.