Join us

बलात्कार पीडितेशी लग्न करणाऱ्याला दया नाहीच; विशेष न्यायालयाने सुनावली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2023 06:24 IST

आरोपीने पीडितेशी विवाह केला म्हणजे त्याने केलेले कृत्य माफ केले जाईल, असे गृहीत धरू नका, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला दया दाखविण्यास नकार दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिच्याशी विवाह करणाऱ्या ३१ वर्षीय आरोपीला विशेष न्यायालयाने दया दाखवण्यास नकार देत साडेतीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. या विवाहातून आरोपीला एक मूलही झालेले आहे.

आरोपीने पीडितेशी विवाह केला म्हणजे त्याने केलेले कृत्य माफ केले जाईल, असे गृहीत धरू नका, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला दया दाखविण्यास नकार दिला. पीडितेने खटल्यात दिलेल्या साक्षीत न्यायालयाला सांगितले की, ती मुंबईच्या पूर्व उपनगरात कुटुंबासह राहात होती. आरोपी तिचा शेजारी होता आणि त्या दोघांत प्रेमसंबंध होते. त्याची कल्पना तिच्या पालकांना होती. १५ ऑगस्ट २०१७ रोजी आरोपीने तिच्याशी बोलायचे आहे, असे सांगत घराजवळ असलेल्या कारखान्यात बोलावले. तेथे त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास सुरुवात केली. यादरम्यान तिचे लक्ष जमिनीवर पडलेल्या ब्लेडवर गेले आणि तिने त्या ब्लेडने आरोपीवर वार केला आणि ती पळून गेली. घरी आल्यावर तिने याबाबत कुटुंबाला माहिती दिली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली.तिने २०२१ मध्ये न्यायालयात दिलेल्या साक्षीत ती आरोपीशी विवाह करण्यास तयार नसल्याचे सांगितले. तिच्या साक्षीवरून व अन्य पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपीला बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी धरले होते.

मूल आहे म्हणजे....गुन्हा घडल्याचे सिद्ध करणारे पुरावे रेकॉर्डवर आहेत, याकडे न्यायालयाने दुर्लक्ष करू शकत नाही, असे विशेष सरकारी वकील गीता शर्मा यांनी न्यायालयाला सांगितले.आरोपीला दया दाखविण्यात आली तर समाजात असा संदेश जाईल की, बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेशी विवाह केला तर तो शिक्षेतून सुटू शकतो, असा युक्तिवाद शर्मा यांनी केला.आरोपी आणि पीडितेचा जन्माला आलेले मूल ही बाब आरोपीला वाचविण्यासाठी वापरू शकत नाही, असे म्हणत न्यायालयाने आरोपीला दया दाखविण्यास नकार दिला. 

टॅग्स :विनयभंगन्यायालयलग्न