Dahisar Toll Plaza: दहिसर टोल नाक्यावरील कोंडीतून मुक्तता नाहीच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:54 IST2025-11-18T12:52:38+5:302025-11-18T12:54:54+5:30
Dahisar Toll Plaza Traffic: दहिसर टोल नाक्यावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार आहे.

Dahisar Toll Plaza: दहिसर टोल नाक्यावरील कोंडीतून मुक्तता नाहीच!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई: दहिसर टोल नाक्यावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी मुंबईकरांना आणखी वाट पाहावी लागणार आहे. हा टोल नाका कायमस्वरूपी स्थलांतरित करण्यासाठी आवश्यक वर्सोवा पुलाजवळील जागा देण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) नकार दिला आहे. त्यामुळे वाहतूक समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी एमएसआरडीसीला अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत.
वसई-विरार, पालघर भागातून मुंबईत येणारे नागरिक, त्याचबरोबर उत्तर भारतातून येणारी वाहने दहिसर टोल नाक्यावरून मुंबईत दाखल होतात. मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी येणाऱ्या वाहनांंमुळे गर्दीच्या वेळी या भागात नेहमीच प्रचंड वाहतूककोंडी असते. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा टोल नाका दिवाळीपर्यंत स्थलांतरित करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले होते. त्यानुसार एमएसआरडीसीने वर्सोवा पुलाजवळ म्हणजेच सध्याच्या टोल नाक्यापासून सुमारे ९ किमी अंतरावर टोल नाका हलविण्याचा निर्णय घेतला होता. ही जागा एनएचएआयच्या हद्दीत येत असल्याने एमएसआरडीसीने त्यांना जागेची मागणी केली होती.
एमएसआरडीसीच्या अडचणी वाढणार
सध्याच्या टोल नाक्यापासून १०० मीटरवर महानगरपालिकेची हद्द संपते. त्यामुळे आता हा टोल नाका स्थलांतरित करण्यासाठी एमएसआरडीसीकडे अन्य पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे एमएसआरडीसीची अडचण आणखी वाढणार असल्याचे बाेलले जात आहे.
या कारणांमुळे जागेस नकार
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र पाठवून टोल नाक्याला जागा देण्यास नकार दिला. गडकरी यांनी ११ नोव्हेंबरला पाठविलेल्या पत्रात राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील दहिसर टोल नाक्याचे एनएचएआयच्या हद्दीत स्थलांतर करणे व्यवहार्य ठरणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दोन टोल नाक्यांतील अंतर ३० किमी इतके कमी होईल. तसेच गैर-राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका राष्ट्रीय महामार्गावर स्थलांतरित करणे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या टोल शुल्क धोरणाशी सुसंगत होणार नाही, असे पत्रात नमूद केले आहे.