लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण होणार अशा सुरू असलेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी पूर्णविराम दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणावर सध्या तरी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केल्याचे सूत्रांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार दर आठवड्याला मंगळवारी पदाधिकारी, आमदारांची बैठक घेतात. मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडली.
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. मात्र हा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यायचा आहे, दोन्ही पक्षांचे नेते एकाच विचारधारेचे आहेत, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यानंतर १० जूनला पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिनी विलीनीकरणाबाबत घोषणा होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. याबाबत काही आमदारांनी मुद्दा उपस्थित केला. अजित पवारांचे नेतृत्व मान्य असेल तरच विलीनीकरण करावे, सुप्रिया सुळे यांनी राज्यात हस्तक्षेप करू नये, अजित पवार यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्यांना माफी मागितल्याशिवाय समाविष्ट करू नये, अशीही मागणी काही आमदारांनी या बैठकीत केली.