"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 11:38 IST2025-12-15T11:29:26+5:302025-12-15T11:38:30+5:30
मला आणि घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा माझी मुख्यमंत्र्यांकडे आहे. जे काम माझ्यावर पक्ष सोपवेल ती जबाबदारी मी पार पाडेन असं तेजस्वी घोसाळकर यांनी म्हटलं आहे.

"खूप गोष्टी आहेत त्या मी बोलू शकत नाही..."; भाजपात प्रवेश करताच तेजस्वी घोसाळकरांनी मांडली व्यथा
मुंबई - दहिसर येथील ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम आणि आमदार प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत मुंबईतील वसंत स्मृती कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. भाजपात प्रवेश केल्यानंतर तेजस्वी घोसाळकर यांनी त्यांची व्यथा मांडत खूप गोष्टी आहेत, त्या मी बोलू शकत नाही. हा निर्णय कठीण आहे. ज्यांनी मला ओळख दिली तो पक्ष सोडताना दु:ख होतंय. पण माझ्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटलं.
पक्षप्रवेश सोहळ्यात तेजस्वी घोसाळकर म्हणाल्या की, खूप काही गोष्टी बोलायच्या आहेत परंतु त्या कसं बोलू माहिती नाही. मला विकासाची कामे करायची आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात माझी सगळी कामे होतील अशी मला अपेक्षा आहे. अभिषेकची हत्या झाली त्याचा सीबीआय संथगतीने तपास करत आहे. मात्र या तपासाला गती देऊन मला आणि घोसाळकर कुटुंबाला न्याय मिळेल हीच अपेक्षा माझी मुख्यमंत्र्यांकडे आहे. जे काम माझ्यावर पक्ष सोपवेल ती जबाबदारी मी पार पाडेन असं त्यांनी म्हटलं आहे.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ वर्षात जो देशाचा विकास केला. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो राज्याचा विकास केला. विशेषत: मुंबई शहराचा कायापालट केला. अटल सेतू, कोस्टल रोड, बीडीडी रहिवाशांना घरे, सीसीटीव्ही, मेट्रोची कामे या विकासकामांची प्रभावित होऊन त्यासोबत हिंदुत्व या मार्गाने आपल्या भविष्याची राजकीय वाटचाल पुढे नेण्याचा निर्णय तेजस्वी घोसाळकर यांनी घेतला आहे. मुंबई शहर विकसित व्हावे आणि हिंदुत्वाचा भगवा झेंडा महापालिकेवर फडकवण्यासाठी, मुंबई शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी तेजस्वी यांनी भाजपात प्रवेश केला असं मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी सांगितले.
शिवसैनिकांना लिहिलं होतं भावूक पत्र
दरम्यान, माझ्या आयुष्यातील अंधाऱ्या काळात आपण दिलेली साथ मी कधीही विसरू शकत नाही.मी कायम तुमच्या ऋणात राहीन. जिथे-जिथे, जेव्हा-जेव्हा संधी मिळेल, तेव्हा-तेव्हा त्या प्रेमाची आणि विश्वासाची परतफेड करत राहीन. आजही मी तुम्हाला शब्द देते- जात-धर्म-पक्ष-विचार न पाहता, जेव्हा आपल्याला माझी गरज भासेल तेव्हा कोणताही विचार न करता मी धावून येईन. अभिषेकच्या जाण्यानंतर माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरले आहे. समाजासाठी प्रामाणिकपणे काम करणे आणि माझ्या मुलांची व सहकाऱ्यांची काळजी घेणे. आज आपणच माझा परिवार आहात. म्हणून बदलत्या परिस्थितीत मला घ्यावा लागणारा हा निर्णय आपण समजून घ्याल अशी माझी मनापासून अपेक्षा आहे असं तेजस्वी घोसाळकर यांनी पत्रातून शिवसैनिकांकडे भावना व्यक्त केल्या.