"तर धारावीकरांसाठी आम्ही आंदोलन उभारू"; उद्धव ठाकरे यांनी संघटनांना दिले आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 10:36 IST2025-06-05T10:36:02+5:302025-06-05T10:36:50+5:30
धारावीकरांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे होतो आणि पुढेही राहू!

"तर धारावीकरांसाठी आम्ही आंदोलन उभारू"; उद्धव ठाकरे यांनी संघटनांना दिले आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: धारावीकरांच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही त्यांच्यासोबत पूर्ण ताकदीने उभे होतो आणि पुढेही राहू. त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. वेळप्रसंगी धारावीकरांसाठी मुंबईभर आंदोलन उभारू, असे आश्वासन उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी दिले. धारावी बचाव आंदोलन कृती समिती, विविध प्रमुख सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारकडून धारावीकरांवर अन्याय होत आहे. त्याविरोधात उद्धवसेनेने सहकार्य करावे, अशी विनंती विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्याचे म्हणणे ऐकून घेतले. धारावीकरांच्या न्याय मागण्यांसाठी यापूर्वीही उद्धवसेनेने आवाज उठविला आहे. मोर्चाही काढला आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे ठाकरे म्हणाले.
उद्धवसेनेचे आ. आदित्य ठाकरे, खा. संजय राऊत, माजी खा. विनायक राऊत, आ. महेश सावंत, सचिव साईनाथ दुर्गे, मुख्य प्रवक्ते हर्षल प्रधान, धारावी बचाव आंदोलन कृती समितीचे राजू कोरडे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपास्थित होते.