Join us
Daily Top 2Weekly Top 5

"...तर मुंबईचा निकाल आणखीन वाईट लागला असता", उद्धव ठाकरे शिवसैनिकांसमोर काय बोलले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 22:05 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. मुंबई महापालिका निवडणुकीनंतर झालेल्या या कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी मोठे विधान केले. 

"ज्या पद्धतीने मतदारयाद्यांचा घोळ केला गेला. ज्या पद्धतीने काही ठिकाणी मतदान केंद्रावर घोळ झाले. आपण वेळेत दुबार मतदार शोधून काढले नसते, तर मुंबईचा निकाल आणखीन वाईट लागला असता. हे तुम्ही जागरूक राहिलात म्हणून निदान इथपर्यंत तरी त्यांना रोखू शकलो. नाहीतर हे धरून चालले होते की, शिवसेना आता संपली", असे सांगत शिवसेना (युबीटी) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे कौतुक केले. 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते. महापालिका निवडणुकीच्या निकालाबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले, "एका निवडणुकीमध्ये आपल्या मनासारखं नसेल झालं. पण, तरीसुद्धा आज निसटता पराभव आपला झालाय. आज आपली चांगली ताकद महापालिकेमध्ये गेलेली आहे. इतर ठिकाणी सुद्धा निवडणुका होत आहेत. निवडणुका जिंकण्याचं तंत्र त्यांनी विचित्र पद्धतीने अवलंबलं आहे." 

'याला लोकशाही म्हणायचं का?'

"यावेळी आपल्या मुंबईमध्ये ईव्हीएम बरोबर व्हीव्हीपॅटचे मशीनच काढून टाकलं. म्हणजे आपण मतदान कोणाला करत आहोत, हेच आपल्याला कळत नाही. आजही तक्रारही येत आहेत की आम्ही बटण दाबलं तिथे लाईट नाही लागला. मी काही कुणावर खापर फोडत नाही. पण, याला लोकशाही म्हणायची का?", असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. 

"मुंबईची लढाई तुम्ही चांगली लढलात. आज सुद्धा सगळेजण हळहळताहेत. देशभरातून प्रतिक्रिया येत आहे की, तुम्ही ही लढाई उत्तम पद्धतीने लढलात. जो एक आभास किंवा चित्र निर्माण केलं गेलं होतं की शिवसेना संपली. ठाकरे नाव पुसून टाकणार. त्यांना तुम्ही रोखलंत. हे फक्त महाराष्ट्र करू शकतो", असे उद्धव ठाकरे म्हणाले. 

"यांना महाराष्ट्र गिळायचा आहे. यावेळी पहिल्यांदा पैशांचा वापर केला गेला. बंद दाराच्या फटीतून पैसे आत फेकले गेले. तुम्ही महाराष्ट्र विकत घेत आहात? मत विकत घ्याल, पण मन कसं विकत घ्याल? शिवसेनेने मराठी माणसाला काय दिले, महाराष्ट्राला काय दिले? बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवले", असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनणार नाही

"जसे पूर्वी गुलाम म्हणून राहत होतो, तसे या दोन व्यापाऱ्यांचे गुलाम म्हणून आपल्या नशिबी जिणं येईल. गुलामीचं जिणं मी जगणं कदापि शक्य नाही. मेलो तरी चालेल. पण, त्या दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून मी जगणार नाही. ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे", असेही ठाकरे यावेळी म्हणाले. 

शिंदे, भाजपावर निशाणा

"आपल्या परत नव्याने सुरूवात करायची आहे. पुन्हा नव्याने सुरूवात करू. शिवसेनेला नवीन पालवी फुटली आहे. काही वेळेला पानगळ होणं गरजेचं असते. सडलेली पानं ही झडलीच पाहिजे. ती झडत नाही, तोपर्यंत नवीन कोंब फुटत नाही. ती सडलेली पानं जर कुणी त्यांच्या झाडाला लावून ती वाढ वाटत असेल, तर त्यांना ते वाटू देत. पण, ती सडलेली आणि झडलेली पानं आहेत, ती तुमच्याकडे टिकणार नाही", असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray: Rigged votes almost cost Mumbai, Shiv Sainiks prevented it

Web Summary : Uddhav Thackeray praised Shiv Sainiks for preventing a worse Mumbai election result due to voter list irregularities. He criticized the removal of VVPAT machines and accused opponents of using money to buy votes, vowing not to be enslaved by anyone.
टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबई महापालिका निवडणूक निकाल २०२६शिवसेनाभाजपाराजकारण