... तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले, थेट सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 12:32 PM2021-03-21T12:32:36+5:302021-03-21T13:31:53+5:30

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.

... then the state will have a string of firecrackers; Raj Thackeray aggressive in Parambir Singh case | ... तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले, थेट सवाल

... तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले, थेट सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देपरमबीर सिंग यांनी म्हणजेच एका पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाची घटना गंभीर असून, इतिहासात देशात अशी घटना घडली नसेल. मूळ विषय म्हणजे अंबानींच्या घराबाहेर गाडी ठेवण्यात आली, त्यामध्ये बॉम्ब होता हा आहे

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एक पत्र लिहिले असून, अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. याप्रकरणी भाजप आक्रमक झाला असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा, अशी मागमी राज ठाकरे यांनी केली होती. त्यानंतर, आज पत्रकार परिषद घेऊन राज यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत. (raj thackeray demands that anil deshmukh should resign over param bir singh letter)

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. त्यानंतर, आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याप्रकरणाचा तपास केंद्र सरकारने करावा, केंद्राने यात हस्तक्षेप करावा, असे राज ठाकरेंनी म्हटलंय.

परमबीर सिंग यांनी म्हणजेच एका पोलीस आयुक्तांनी राज्याच्या गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाची घटना गंभीर असून, इतिहासात देशात अशी घटना घडली नसेल. मूळ विषय म्हणजे अंबानींच्या घराबाहेर गाडी ठेवण्यात आली, त्यामध्ये बॉम्ब होता हा आहे. त्यामुळे, या विषयापासून भरकटता कामा नये. परमबीर सिंग यांची चौकशी न करता बदली का केली? असा प्रश्न राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी यांचे अत्यंत मधुर संबंध आहेत, ते सर्वश्रूत आहे. तर, वाझे हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अतिशय जवळचा माणूस आहे. मग, कोणीतरी सांगितल्याशिवाय मुकेश अंबानींच्या घराबाहेर वाझे जिलेटीन कांड्यांची गाडी ठेवेल का? असा प्रश्न राज यांनी विचारला. पोलीस आयुक्त असो किंवा एखादा पोलीस अधिकारी, हे कोणाच्या तरी सूचना असल्याशिवाय बॉम्ब ठेवण्याचे धाडस करणार नाहीत. त्यामुळे, वाझे आणि परमबीरसिंग यांच्यापुरता हा विषय नाही. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करावा, कारण राज्य सरकारकडून याची चौकशी होणार नाही. जर, केंद्राकडून खऱ्या अर्थाने चौकशी झाली तर फटाक्याची माळ लागेल, कोण कोण आत जातील याची कल्पनाही आपण करू शकणार नाही, असे राज ठाकरेंनी म्हटलं.    

पोलीस बॉम्ब ठेवतात, किंवा पोलिसांना बॉम्ब ठेवायला सांगितलं जातंय, ही शिल्लक घटना नाही. कुणाकुणाची नावं पुढे येतील, कोण-कोण यामध्ये दडलंय हेही पुढे येईल. कल्पनेच्या बाहेरचे चेहरे समोर येतील, फटाक्यांची माळ लागेल, असे म्हणत परमबीर सिंग यांच्या पत्रानंतर राज ठाकरे आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. अनिल अंबानी यांना इस्रायल सिक्युरिटी असून मध्य प्रदेशच्या पोलिसांचेही त्यांना संरक्षण असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अतिरेकी जो विचार करतात, तो विचार हे लोकं करतात, पोलिसांना हे काम करायला लावतात. मला लाज वाटली काल, उज्ज्वल परंपरेच्या महाराष्ट्राचा गृहमंत्री बारमधून पैशांची वसुली करायला लावतो. जर गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे. एवढी विचित्र अवस्था मी कधीच पाहिली नव्हती, गृहमंत्र्यांनी राजीनाम दिलाच पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणीही राज यांनी केली. 

मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री देशमुखांचा राजीनामा घ्यावा

परमबीर सिंग यांच्या आरोपांनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. सिंग यांनी केलेले आरोप केवळ खळबळजनक नाहीत, तर ते अतिशय धक्कादायक आहेत. डीजी दर्जाचा अधिकारी इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप करत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून पोलीस दलात धक्कादायक घटना घडत आहेत. त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खच्ची होत आहेत. पण ही घटना म्हणजे या प्रकरणातला कळस आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्यांचा राजीनामा घ्यावा, असे फडणवीस म्हणाले.

संजय निरुपम यांची पवारांवर टीका

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. 'परमबीर सिंग यांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्यास, त्यांचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा. कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत. तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?', असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं या विषयात ठाम भूमिका घ्यायला हवी, अशी अपेक्षादेखील त्यांनी व्यक्त केली आहे. 

संजय राऊत म्हणतात

अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या गंभीर आरोपांमुळे ठाकरे सरकारदेखील अडचणीत सापडलं आहे. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेना खासदार संजय राऊत (ShivSena MP Sanjay Raut) यांनादेखील सरकारचा बचाव करणं अवघड होत असल्याचं दिसत आहे. 'अशा प्रकारचे गंभीर आरोप होणं मंत्र्यांसाठी, सरकारसाठी दुर्दैवी आहे. परमबीर सिंग यांनी केलेले आरोप धक्कादायक आहेत,' असं संजय राऊत म्हणाले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

Web Title: ... then the state will have a string of firecrackers; Raj Thackeray aggressive in Parambir Singh case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.