... तर माझं काम सोपं होईल, बिचुकलेंनी सांगितलं राष्ट्रपदीपदाच्या निवडणुकीचं गणितं
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 09:06 AM2022-06-19T09:06:58+5:302022-06-19T09:08:56+5:30
गतवर्षीच्या निवडणुकीत, मी बहुजन समाजातील आहे, अतिशय निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती आहे हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं.
मुंबई - राज्यात सध्या विधानपरिषद आणि देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची जोरदार चर्चा अन् रणधुमाळी सुरू आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवरुन गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चांच्या फैरी सुरू आहेत. परंतु, अशातच राष्ट्रपतीपदासाठी बिग बॉग फेम अभिजित बिचुकले यांनीही अर्ज दाखल करणार असल्याचं म्हटलं आहे. “हे सत्य आहे. मी सध्या पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील काही आमदारांशी खासदारांशी सह्या देण्यासंदर्भात बोलत आहे, असे बिचुकले यांनी म्हटले होते. आता, त्यांनी थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनाच साकडं घातलं आहे.
गतवर्षीच्या निवडणुकीत, मी बहुजन समाजातील आहे, अतिशय निर्व्यसनी, सुशिक्षित आणि कायद्याची माहिती आहे हे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं होतं. परंतु, त्यावेळी त्यांनी कोणीतरी कोविंदसाहेब शोधून आणले आणि त्यांना देशाचं राष्ट्रपतीपद दिलं. त्यांना बहुमतामळे ते जमलं,” असं बिचुकले म्हणाले होते. आता, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी 100 आमदारांच्या सह्यांचं पत्र लागतं. त्यामुळे, शरद पवारांनी मला पाठिंबा द्यावा, माझं काम सोप्प होईल, अशी विनंती अभिजीत बिचुकले यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली आहे.
शरद पवार यांनी राज्यात सत्तांतर घडवून आणलं, शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. त्यामुळे, महाराष्ट्रातील एक लढवय्या म्हणून पवारसाहेबांनी मला पाठिंबा दिल्यास माझं काम सोप्प होईल. मला 100 आमदारांच्या सह्या सहजच मिळू शकतील, असे बिचुकले यांनी म्हटले.
दरम्यान, मी देशातील आमदार, खासदार यांच्याशी बोलतोय. सांगली, कोल्हापूर, पुण्यातील खासदारांशी चर्चा सुरू आहे. अर्जावर अनुमोदन करण्याची संख्या मिळाली, तर माझा अर्ज १०० टक्के जाणार. अर्ज जोवर मी भरत नाही तोवर मला गुपित ठेवायचं होतं,” असंही बिचुकले म्हणाले. लोकमतशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी आपण राष्ट्रपतीपदासाठी इच्छुक असल्याचं म्हटलं.