"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 16:43 IST2026-01-13T16:41:58+5:302026-01-13T16:43:21+5:30
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस हे बसवलेले मुख्यमंत्री आहेत, असे ठाकरेंनी शिवराज सिंह चौहान यांचे उदाहरण देत सांगितले.

"...तर तेव्हा उपमुख्यमंत्री झाले नसते'; बसवलेला मुख्यमंत्री म्हणत राज ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा
अदानी समूहाच्या वेगाने होत असलेल्या विस्तारावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीस हे हिंमतीवर मुख्यमंत्री झाले नाहीत? असे तुम्हाला वाटते का, असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर राज ठाकरे म्हणाले की, "भाजपामध्ये विचारून बघा ना, एकदा", असे म्हणत भूमिका मांडली.
राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. "राज्यकर्ता हा बसलेला माणूस पाहिजे, बसवलेला माणूस असेल ना तर त्याच्याकडून काही होत नाही. तो फक्त धन्याने (मालक) वरून काय सांगितलं, त्याच्यावर सह्या करण्याइतकंच काम त्याचं असतं. मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान स्वतःच्या हिंमतीवर मुख्यमंत्री झालेले", असे राज ठाकरे म्हणाले.
तुमचं म्हणणं आहे की, देवेंद्र फडणवीस हे स्वतःच्या हिंमतीवर मुख्यमंत्री झालेले नाहीत?, असा प्रश्न राज ठाकरेंना विचारण्यात आला.
"...तर फडणवीसांनी ठाम नकार दिला असता"
राज ठाकरे म्हणाले, "भाजपामध्ये विचारून बघा ना, एकदा. अहो साधी गोष्ट आहे. एक माणूस (फडणवीस) मुख्यमंत्री होता. निवडणूक झाली, संपली. मग शिवसेना फोडली. मग शिंदे आले. मग त्या (फडणवीस) मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्री केलं आणि ते त्यांनी स्वीकारलं. जर एखादा बसलेला माणूस असता. ठाम माणूस असता, तर त्याने नकार दिला असता. बसलेला आणि बसवलेला यामध्ये फरक असतो ना?
"जो भारतीय जनता पक्ष होता, जो आम्ही पूर्वीपासून पाहत आलोय ना, आज तो पक्ष उरलेला नाही. हे भारतीय जनता पक्षातील लोकही मान्य करतील. भारतात प्रादेशिक अस्मिता असणार्या प्रादेशिक पक्षांची गरज आहे", असे राज ठाकरे म्हणाले.
"तुम्ही अहमदाबाद, बडोद्याची मुंबई करा"
"मूळात हा कधी देश नव्हता. ज्याला आपण राज्य म्हणतो ते वेगवेगळे देशच होते. हा १९४७ साली झालेला देश आहे. प्रत्येक राज्याची आपापली भाषा, संस्कृती, संस्कार, सण आहेत. तुम्ही अहमदाबाद, बडोदा यांची मुंबई करा ना. तुम्ही आमची शहरे बळकावून काय साध्य करत आहात? आता हे जे चालले आहे, यामुळे राष्ट्रीय ऐक्यास धोका पोहचेल असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. आता तेच सुरू आहे", असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.