... 'तर मग शिवभक्तांनाही महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाता आलं पाहिजे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 20:23 IST2020-07-21T19:22:55+5:302020-07-21T20:23:26+5:30
दुर्गराज रायगडावरील महत्वाचे व पवित्र ठिकाण म्हणजे राजसदर. समतेचं, ममतेचं आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचं हे ठिकाण म्हणजे भारतवर्षाचे अक्षय उर्जास्थान.

... 'तर मग शिवभक्तांनाही महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाता आलं पाहिजे'
मुंबई - राज्यसभा खासदार संभाजीराजे भोसले यांनी रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजसदरेवर शिवभक्तांना जाण्यास का परवानगी नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. सिनेमातले नट, पुढारीलोक महाराजांच्या सिंहासनापर्यंत जाऊ शकतात, तर मग शिवभक्तांनासुद्धा तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य अशी नेतेमंडळी किंवा काही प्रशासकीय अधिकारी सहज पणे चौथऱ्यापर्यंत जातात. त्याचवेळी शिवभक्त सुद्धा शेकडो किलोमीटरचा प्रवास करून येतो, त्यांनाही जवळून दर्शन घेता आलं पाहिजे. त्यामुळे प्राधिकरणाच्या वतीने ASI ला ताबडतोब पत्र देण्याचे निर्देश संभाजीराजेंनी दिले आहेत.
दुर्गराज रायगडावरील महत्वाचे व पवित्र ठिकाण म्हणजे राजसदर. समतेचं, ममतेचं आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचं हे ठिकाण म्हणजे भारतवर्षाचे अक्षय उर्जास्थान. याच सिंहसनावरून महाराजांनी देशाला दिशा दिली. अश्या पवित्र ठिकाणाचे धुलीकण आपल्या मस्तकी लावण्यासाठी शेकडो किलोमीटर दुरवरुन शिवभक्त गडावर दररोज येत असतात. त्या सर्वांची फार माफक अपेक्षा असते, महाराजांच्या चरणकमलावर माथा टेकून युगपुरूषास अभिवादन करावे, जवळून दर्शन घ्यावे. परंतु मागच्या काही वर्षांपासून राजसदरेवर शिवभक्तांना जाण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामूळे अनेक शिवभक्त नाराज होताना दिसतात.
"राजसदरेवरील कोणत्याही भागाला शिवभक्त नुकसान पोहोचवणार नाहीत. त्यांच्यासाठी महाराज हे सर्वस्व आहेत. त्यामुळे महाराजांच्या मुर्तीला तसेच, सिंहासन चौथऱ्याला प्राणपणाने जपतील हा विश्वास मला आहे. तरीही जी काही सुरक्षा व्यवस्था करायची असेल ती पुतळ्याशेजारी असेल. शिवभक्तांना लांबून पाठवणे योग्य नाही.", असे संभाजीराजेंनी म्हटले. तसेच, लवकरच सर्व शिवभक्तांना राजसदरेवर जाऊन महाराजांचे दर्शन घेता येईल, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला आहे. आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन यासंदर्भातील एक व्हिडिओही त्यांनी शेअर केला आहे.