शहरात २७ गॅस सिलिंडरची लूटमार; कांदिवली-चारकोपमध्ये गॅस एजन्सीचा टेम्पो फोडून चोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 12:07 IST2026-03-29T12:07:10+5:302026-03-29T12:07:24+5:30
रिकामे सिलिंडरही चोरट्यांनी पळविले

शहरात २७ गॅस सिलिंडरची लूटमार; कांदिवली-चारकोपमध्ये गॅस एजन्सीचा टेम्पो फोडून चोरी
मुंबई : मुंबईत घरगुती गॅस सिलिंडरची तीव्र टंचाई असल्याने नागरिक त्रस्त झाले असतानाच कांदिवलीतील (प.) चारकोप परिसरात चक्क २७सिलिंडरच्या लुटीचा प्रकार घडला आहे. गॅस एजन्सीचा टेंपो फोडून सिलिंडर लंपास करण्यात आले आहेत. तर कांदिवलीत गॅस एजन्सी चालक आणि दोन सिलिंडर डिलीव्हरी बॉयनाही ग्राहकांनी मारहाण केली आहे.
आखातातील युद्धामुळे घरगुती गॅस पुरवठ्यात अडचणी असल्याने सिलिंडरच्या टंचाई भेडसावत आहे. ऑनलाईन नोंदणी करूनही सिलिंडर मिळत नाहीत किंवा नोंदणीत अडचणी येत आहेत. त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर सकाळपासूनच ग्राहकांच्या सिलिंडर घेऊन रांगा लागत आहेत. घरगुती गॅसची टंचाई नाही, असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत असले तरी ग्राहकांना सिलिंडर मिळत नसल्याने ते वैतागलेले आहेत. या पार्श्वभूमीवर चारकोपमध्ये हिंदुस्थान पेट्रोलियमच्या श्रीजी गॅस एजन्सीचा टेंपो फोडून २७ सिलिंडर पळवून नेण्यात आल्याची घटना २६ मार्च रोजी घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली असून चारकोप पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काळाबाजारात अडीच ते पाच हजारात
सिलिंडर गॅसचा भरलेला सिलिंडर काळा बाजारात अडीच ते पाच हजार रुपयांपर्यंत विकला जात आहे. तर रिकामे सिलिंडर तीन ते चार हजार रुपयांना खरेदी करून ते भरून घेतले जात आहेत. काळाबाजार रोखण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे.
टेम्पोची काच फोडून चोरी; १५ हजारांचा मुद्देमाल गायब
मालाडमधील नंदकुमार सोनी (३५) हे गेल्या सात वर्षापासून चारकोप परिसरात श्रीजी गॅस एजन्सीमध्ये सिलिंडर डिलिव्हरीचे काम करतात. त्यांनी २५ मार्च रोजी दिवसभर डिलिव्हरी केल्यानंतर रात्री सुमारे ११ वाजता आपला टेम्पो चारकोपमधील काका केणी चौकात उभा केला होता. मात्र ते २६ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजता परत आल्यावर त्यांना टेम्पोची काच फुटलेली व मागील दरवाजाची कड़ी तुटलेली आढळली. त्यांनी तपासणीत टेम्पोमधील १५ हजार ५०० रुपये किमतीचे एकूण २७ गॅस सिलिंडर (५ भरलेले व २२ रिकामे) चोरीस गेल्याचे निष्पन्न झाले.