‘केईएम’च्या हॉस्टेलमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; महिला ताब्यात; ‘ENT’ची ट्रेनी असल्याचा बनाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 14:05 IST2025-06-06T14:04:56+5:302025-06-06T14:05:30+5:30

एका डॉक्टराने रंगेहाथ पकडत भोईवाडा पोलिसांच्या दिले ताब्यात

Theft attempt foiled in KEM hostel; Woman arrested; pretended to be ENT trainee | ‘केईएम’च्या हॉस्टेलमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; महिला ताब्यात; ‘ENT’ची ट्रेनी असल्याचा बनाव

‘केईएम’च्या हॉस्टेलमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; महिला ताब्यात; ‘ENT’ची ट्रेनी असल्याचा बनाव

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: परळच्या केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरांच्या होस्टेलमध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या महिलेस एका डॉक्टराने रंगेहाथ पकडत भोईवाडा पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना बुधवारी घडली. आरती देवनानी (३९, मूळ रा. नागपूर) असे तिचे नाव असून, तिच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तक्रारदार डॉ. ऐश्वर्या भुमरे (२८) आणि डॉ. निकिता उंबरकर (२८) या ‘केईएम’च्या यूजीबीजी होस्टेलमध्ये राहतात. बुधवारी दोघी सकाळी ८ वाजता रूम बंद करून त्याची चावी दरवाजाच्या खिडकीवर ठेवून रुग्णालयात गेल्या. त्या दुपारी जेवणासाठी आल्या असताना त्यांच्या रूमचे लॉक उघडलेले दिसले. दोघींनी दरवाजा उघडला तेव्हा एक महिला त्यांना रूमच्या खिडकीच्या समोर उभी राहून त्यांच्या खोलीतील पर्स घेताना दिसली. मात्र दरवाजाच्या आवाजाने दाचकून तिने पर्स खाली ठेवली. 

आधी नेहा, मग रितिका !

सुरक्षा अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर आधी नेहा नाव सांगणाऱ्या महिलेने तिचे नाव रितिका सांगितले. त्यामुळे डॉ. भुमरे यांचा संशय बळावला. अखेर सुरक्षारक्षकांनी पोलिस नियंत्रण कक्षास फोनद्वारे या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आहे.

उडवाउडवीची उत्तरे

रूमची चावी कोणी दिली, अशी विचारणा तक्रारदारांनी तिला केली. तेव्हा तिने स्वतःचे नाव नेहा सांगत ‘ईएनटी’त ट्रेनी असल्याचे सांगितले.  आपली मैत्रीण आठव्या मजल्यावर राहत असून, लिफ्टच्या समस्यामुळे चुकून नवव्या मजल्यावर आल्याचे ती म्हणाली. दोघांनी तिच्याकडे ओळखपत्र विचारले. मात्र, पुन्हा मी ईएनटी विभागात आहे. सॅनिटरी पॅडसाठी डॉक्टरच्या रूममध्ये आल्याचे तिने सांगितले. डॉ. भुमरे यांनी तिला आठव्या मजल्यावर नेताच तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे तिला तळमजल्यावरील सुरक्षारक्षक बाळकृष्ण थोरे यांच्याकडे नेले.

Web Title: Theft attempt foiled in KEM hostel; Woman arrested; pretended to be ENT trainee