मुंबईत ‘एमडीआर टीबी’चा राज्यातील सर्वांत लहान रुग्ण, ‘जेजे’त उपचार; आईकडून संसर्ग झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 10:46 IST2025-08-07T10:44:43+5:302025-08-07T10:46:44+5:30
विशेष म्हणजे अशा पद्धतीचा आजार झालेला हा राज्यातील सर्वांत लहान मुलगा आहे. आईला टीबीचा आजार झाल्याने त्याचा संसर्ग बालकाला झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मुंबईत ‘एमडीआर टीबी’चा राज्यातील सर्वांत लहान रुग्ण, ‘जेजे’त उपचार; आईकडून संसर्ग झाल्याची शक्यता
मुंबई : टीबीचा रुग्ण म्हटले की, सर्वसाधारण तरुण आणि प्रौढ व्यक्तीमध्ये आढळणारा हा आजार असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण वाढले आहे. जेजे रुग्णालयात सध्या तीन महिन्यांचा मुलगा औषध-प्रतिरोधक (मल्टी ड्रग्स रेजिस्टंट टीबी) या आजाराने ग्रस्त असून, त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे अशा पद्धतीचा आजार झालेला हा राज्यातील सर्वांत लहान मुलगा आहे. आईला टीबीचा आजार झाल्याने त्याचा संसर्ग बालकाला झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
उपनगरात राहत असणाऱ्या महिलेला टीबीच्या आजाराचे निदान झाल्यामुळे तेथील स्थानिक डॉक्टरांनी पुढील उपचाराकरिता जेजे रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी आल्यावर डॉक्टरांनी त्याच्या सोबत असलेल्या तीन महिन्यांच्या मुलाच्या टीबीशी निगडित वैद्यकीय चाचण्या केल्या. त्यावेळी त्या मुलाच्या छातीत काही गाठी आहेत हे स्पष्ट झाले. त्या अनुषंगाने बाल रोग विभागातील डॉक्टरांनी आणखी काही चाचण्या केल्या. त्यावेळी या बाळाला एमडीआर टीबी झाला असल्याचे निदान
करण्यात आले.
लक्षणेविरहित आजार
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, एमडीआर टीबी झालेल्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात खोकला येतो. त्यासोबत ताप येऊन वजन कमी होते. मात्र, या बाळाचा जन्म झाल्यापासून आता वजन चांगल्या पद्धतीने वाढत असल्याचे दिसून आले आहे. या बाळाला टीबीची कोणतीही लक्षणे नव्हती, डॉक्टरांनासुद्धा हे कोडे अजून उलगडलेले नाही.
मोफत उपचार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जेजे रुग्णालयाला सेंटर ऑफ एक्सएलन्स फॉर ड्रग्स - रेजिस्टंट टीबी हा दर्जा दिला आहे. त्यामुळे या आजाराशी संबंधित नवीन अत्याधुनिक उपचार या रुग्णालयात प्रथम दिले जातात.
या आजारासाठी महिन्याला किमान १५ ते २० हजारांचा औषधांसाठी खर्च येतो. तसेच वैद्यकीय चाचण्यांचा खर्च वेगळा; मात्र जेजे रुग्णालयात या आजारावरील उपचारासाठी मोफत औषधे पुरविली जातात.
राज्यातील इतक्या कमी वयात एमडीआर टीबी झाला असल्याची ही पहिलीच घटना आहे. या इतक्या कमी वयाच्या मुलावर या आजारावरील उपचार देणे जोखमीचे असते. त्या मुलाची तब्बेत आता बरी आहे. काही वेळा श्वसनाचा त्रास होतो. मात्र, त्याची प्रकृती स्थिर आहे. २०२२ पासून जेजे रुग्णालयात पाच वर्षांखालील मल्टी ड्रग्स रेजिस्टंट टीबी असणाऱ्या बालकांना उपचार दिले जातात. त्यामध्ये आतापर्यंत ५२ रुगांना उपचार दिले. त्यापैकी १८ रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत.
डॉ. सुशांत माने, सहयोगी प्राध्यापक, बालरोग विभाग, सर जेजे रुग्णालय