भुयारी मेट्रो सुसाट, मात्र रस्ते मोकळे कधी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 09:42 IST2025-10-08T09:41:29+5:302025-10-08T09:42:00+5:30
शेवटच्या टप्प्यातील स्टेशन परिसरात रस्त्यांची कामे सुरूच : कोंडीमुक्त प्रवासाची वाहनचालक, स्थानिकांना प्रतीक्षाच

भुयारी मेट्रो सुसाट, मात्र रस्ते मोकळे कधी?
- अमर शैला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा गुरुवारपासून प्रवाशांसाठी खुला होत आहे. मात्र, सायन्स म्युझियम, ग्रँट रोड, गिरगाव आणि जगन्नाथ शंकर शेठ या मेट्रो स्टेशनबाहेरील रस्त्यांची कामे अद्यापही सुरू आहेत. त्यामुळे ती पूर्ण होण्यासाठी आणखी काही महिने लागणार आहेत. त्यानंतरच रस्ते पूर्ववत होणार असून, वाहनचालकांना कोंडीमुक्त प्रवास करणे शक्य होणार आहे.
मेट्रो-३ मार्गिकेसाठी रस्ते मोठ्या प्रमाणात अडविल्याने या मार्गाच्या परिसरात मागील सात ते आठ वर्षांपासून प्रवाशांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. आता मेट्रो मार्गिका सुरू झाल्यावरही काही स्टेशनची कामे सुरूच राहणार आहेत. भुयारी मेट्रोतून जलद प्रवास होत असला तरी रस्त्यावर गर्दीच्या वेळी वाहनचालकांना कोंडीचा प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे मेट्रो स्टेशनवरील रस्ते लवकरात लवकर पूर्ववत करावेत, अशी अपेक्षा वाहन चालकांकडून व्यक्त केली जात आहे.
११ किमी टप्प्यासाठी १२ हजार कोटींचा खर्च
सायन्स सेंटर ते कफ परेड असा १०.९९ कि.मी.चा टप्पा १२,१९५ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा मार्ग मंत्रालय, उच्च न्यायालय, आरबीआय, शेअर मार्केट, मरिन ड्राइव्हसारख्या आर्थिक व सांस्कृतिक ठिकाणांना जोडला जाणार आहे.
गिरगाव स्टेशनच्या आतील भागातील कामे पूर्ण झाली आहेत. मात्र, रस्त्यावरील दोन्ही बाजूची कामे मोठ्या प्रमाणात बाकी आहेत. या भागातील रस्त्याची सध्या एकच बाजू सुरू आहे. ही बाजूही तात्पुरत्या स्वरूपात लोखंडी प्लेट्सने उभारलेल्या रस्त्यावरून सुरू आहे. तर, दुसऱ्या बाजूकडील भागातील काही मार्गावर क्राँक्रीटचा रस्ता तयार केला असून, काही भागांत भराव टाकण्याचे काम अद्यापही सुरूच आहे.
ग्रँट रोड मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वाराबाहेर शिड्या लावण्यात आल्या आहेत. या शिड्यांच्या सहाय्याने सिलिंगचे काम कामगार करत आहेत. बुधवारी ही कामे पूर्ण केली जाणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तर, रस्त्याच्या एका बाजूच्या मार्गावर भराव घालण्याचे काम सुरू असून, पुढील काही महिने हे काम चालेल, अशी माहिती जाणकारांनी दिली.
या स्टेशनच्या परिसरातील रस्त्याच्या दोन्ही बाजूचा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्यात आला आहे. मात्र, प्रवेशद्वारांच्या भागातील रस्त्यांची कामे शिल्लक आहेत. रखांगी चौकात एका प्रवेशद्वाराचे काम रखडले आहे.
या स्टेशनवरील रस्त्याची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. एका बाजूच्या रस्त्यावर जेसीबीच्या साहाय्याने भराव टाकला जात असून, त्यानंतर काॅंक्रीटचा रस्ता आणि पदपथाची उभारणी केली जाणार आहे.