श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:29 IST2025-10-03T06:28:46+5:302025-10-03T06:29:12+5:30
स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी नेते डॉ. गुणवंतराय गणपतलाल पारीख अर्थात जी. जी. पारीख यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले.

श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
मुंबई : महात्मा गांधींनी ब्रिटिशांविरोधात पुकारलेल्या ‘चले जाव’च्या आंदोलनात ऐन उमेदीत स्वत:ला झोकून देणारे आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अंतिम श्वासापर्यंत गांधी विचारांचा कृतीशील प्रसार-प्रचार करणारे स्वातंत्र्यसेनानी, समाजवादी नेते डॉ. गुणवंतराय गणपतलाल पारीख अर्थात जी. जी. पारीख यांचे गुरुवारी मुंबईत निधन झाले. त्यांनी गेल्या ३० डिसेंबर रोजी वयाची शंभरी पूर्ण केली होती. श्वासात, ध्यासात, कृतीत गांधी विचारांचा वारसा जपलेल्या डॉ. जी. जी. पारीख यांची प्राणज्योत गांधी जयंतीच्या दिवशी मावळणे हा दुर्लभ योगायोगच.
डॉ. जी. जी. पारीख यांनी ग्रँट रोड येथील त्यांच्या निवासस्थानी पहाटे ५ वाजता अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगी सोनल शाह आणि नातू कबीर शाह असा परिवार आहे. त्यांनी मृत्युपश्चात देहदान केले. ‘जी जी’ या आद्याक्षरांनीच ते सर्वोदयी-समाजवादी परिवारात ओळखले जात. त्यांनी पनवेल जवळील तारा येथे ग्रामीण भागातील नागरिकांच्या उन्नतीसाठी १९६२ ला युसूफ मेहरली सेंटर सुरू केले. अंतिम श्वासापर्यंत ते या केंद्राचे काम पाहत होते.
डॉ. पारीख यांचा जन्म ३० डिसेंबर १९२४ रोजी सौराष्ट्रातील सुरेंद्रनगर येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते. त्यांच्या वडिलांनी राजस्थान सरकारमध्ये असिस्टंट डायरेक्टर ऑफ मेडिकल सर्व्हिस हे पद भुषविले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांनी जी. एस. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी मिळविली. त्यांचे शालेय शिक्षण जयपूर, कानपूर आणि सुरेंद्रनगर येथे झाले होते.
मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयातून ते बीएससी झाले होते. महाविद्यालयीन शिक्षण सुरू असतानाच त्यांनी विद्यार्थी चळवळीत भाग घेतला. ते महाविद्यालयात असताना १९४२ ला गांधीजींनी ब्रिटिशांना ‘चले जाव’चा इशारा दिला. त्याने प्रेरित होऊन डॉ. पारीख स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय झाले. ब्रिटिशांनी त्यांना अटक केली. त्यांनी दहा महिने तुरुंगवास भोगला.
आणीबाणीत २० महिने तुरुंगवास
जून १९७५ मध्ये आणीबाणी जाहीर झाली त्यावेळी डॉ. पारीख समाजवादी पक्षाच्या मुंबई युनिटचे अध्यक्ष होते. कामगार नेते जॉर्ज फर्नांडीस, तसेच विरेन शहा यांच्यासह बडोदा डायनामाइट प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली. आणीबाणीत त्यांनी येरवडा आणि तिहार जेलमध्ये २० महिने तुरुंगवास भोगला. देशात १९७७ ला निवडणुका जाहीर झाल्यावर त्यांची सुटका झाली. त्यांच्या पत्नी मंगला पारीख यांनाही प्रमीला दंडवते यांच्यासह मीसा कायद्याखाली आणीबाणीत अटक झाली होती.