मुंबई - कॉमेडिअन कुणाल कामरा याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणं लिहिणं भोवलं आहे. कुणाल कामराविरोधात शिंदेसेना चांगलीच आक्रमक झाली. शिवसैनिकांनी कामरा याच्या स्टुडिओची तोडफोड केली. कुणाल कामरानं माफी मागावी अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी केली. त्यातच आता बीएमसी अधिकाऱ्यांचं पथक मुंबईच्या हॅबिबेट स्टुडिओला हातोडा घेऊन पोहचलं आहे. या वादानंतर हे स्टुडिओ बंद केल्याचं हॅबिबेट स्टुडिओनं सांगितले होते परंतु याठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर पालिका कारवाई करणार आहे.
कुणाल कामरानं त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात त्याने बॉलिवूड सिनेमा दिल तो पागल है या गाण्यावर व्यंगात्मक गाणं बनवलं होते. त्यातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खोचक विनोद केला होता. हे गाणं व्हायरल झाल्यानंतर शिंदेसेना आक्रमक झाली. काही संतप्त नेत्यांनी कार्यकर्त्यांसह मुंबईतील खार भागात असणाऱ्या स्टुडिओची तोडफोड केली. त्यात कुणाल कामरा विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिंदेसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी ही तक्रार दिली आहे.
कामराचा बोलविता धनी कोण? - उदय सामंत
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाला काहीही बोलण्याचा अधिकार दिला नाही. कुणाल कामराने कुणाच्या तरी सांगण्यावरून वैयक्तिक गाणं लिहिणे हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात नाही. आमच्या नेत्याबद्दल कुणी बोलत असेल तर कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. कुणाल कामराचे फोटो पाहिले तर कोणासोबत बसलेला आहे. कुणाशी बोलतोय हे स्पष्ट आहे. हे सर्व पूर्वनियोजित आहे. प्रत्येकाच्या आपापल्या नेत्याच्या स्वाभिमान, अभिमान असतो. कुणाल कामराच्या मागे बोलविता धनी कोण हे तपासले पाहिजे अशी मागणी मंत्री उदय सामंत यांनी केली.
...हा काय महाराष्ट्रातील जनतेपेक्षा मोठा आहे का?
दरम्यान, हा विषय अतिशय गंभीर आहे. हास्य, व्यंग याचा पुरस्कार करणारे आपण आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र मानणारे आम्ही आहोत. परंतु अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य स्वैराचाराकडे जात असेल तर ते मान्य होऊ शकत नाही. स्टँडअप कॉमेडिअन कुणाल कामरा याचा पूर्व इतिहास पाहिला तर देशाचे पंतप्रधान, मुख्य न्यायाधीश किंवा न्यायव्यवस्था यांच्याबाबत अत्यंत खालच्या शब्दात बोलणे, न्यायव्यवस्थेवर विश्वास राहणार नाही असं बोलणं ही त्याची कार्यपद्धती आहे. वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा हव्यास आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करत अतिशय खालच्या दर्जाची कॉमेडी करण्याचा प्रयत्न केला. २०२४ च्या निवडणुकीने कोण खुद्दार आणि कोण गद्दार हे जनतेने ठरवलेले आहे. हा महाराष्ट्राच्या जनतेपेक्षा मोठा आहे का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामराला विचारला आहे.