पदपथ धोरणाला आता पालिकेकडूनच हरताळ! कुलाब्यात फुटपाथवरच शौचालयाचे बांधकाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 10:08 IST2025-07-01T10:07:51+5:302025-07-01T10:08:42+5:30
याला आक्षेप घेत त्यांनी फुटपाथवर शौचालय बांधल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होईल, शिवाय त्यांचा जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागेल, असे म्हटले आहे.

पदपथ धोरणाला आता पालिकेकडूनच हरताळ! कुलाब्यात फुटपाथवरच शौचालयाचे बांधकाम
मुंबई : फेरीवाल्यांमुळे मुंबईत आधीच चालायला फुटपाथ उपलब्ध नसताना आता पालिका स्वतःच पदपथ धोरणाची पायमल्ली करत असल्याचे आता समोर आले आहे. कुलाबा परिसरातील लायन गेटसमोर पालिकेकडून फुटपाथवरच सार्वजनिक शौचालय उभारण्यात येत असून त्याला नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. पालिकेने हे काम ताबडतोब थांबवावे, अशी मागणी आता पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.
याला आक्षेप घेत त्यांनी फुटपाथवर शौचालय बांधल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होईल, शिवाय त्यांचा जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागेल, असे म्हटले आहे.
याबाबत माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी म्हटले आहे की, फुटपाथवर पहिला अधिकार पादचाऱ्यांचा असतो. त्यांना कोणत्याही अडथळ्याविना पदपथ वापरता आला पाहिजे, असे पदपथ धोरणात नमूद आहे. लायन गेटसमोरील सार्वजनिक शौचालयामुळे पादचाऱ्यांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्त्यावरून चालावे लागेल. त्यातच नेव्हल डॉकयार्डची सांस्कृतिक वास्तू असलेला हा परिसर ‘ग्रेड ए हेरिटेज परिसर’ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पालिकेने येथील फुटपाथवर सार्वजनिक शौचालयाचे काम हाती घेणे आश्चर्यकारक आहे. पालिकेच्या या भूमिकेला नागरिकांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे, असे नार्वेकर यांनी सांगितले.
कार्यादेश तत्काळ रद्द करण्याची मागणी
यासंदर्भात नार्वेकर यांनी पालिका आयुक्तांसह हेरिटेज कमिटीलाही पत्र लिहून या कामासाठी दिलेले कार्यादेश तत्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक शौचालयासाठी अंदाजे १.७० कोटी खर्च येणार आहे. शिवाय बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले जाईल, ज्याचा परिणाम नौदल क्षेत्रावर होईल.
त्यामुळे नवीन शौचालय बांधण्याआधी चौकशीसाठी जागेची तपासणी करावी, अशी मागणीही नार्वेकर यांनी केली आहे.
२०१६ च्या पादचारी धोरणानुसार पादचाऱ्यांचा विनाअडथळा पदपथ मिळणे आवश्यक आहे. मात्र पालिकेनेच या धोरणाला हरताळ फासला आहे. फुटपाथवर अशी बांधकामे केल्याने पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात येणार आहे.
मकरंद नार्वेकर, माजी नगरसेवक