मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 06:51 IST2025-10-03T06:51:05+5:302025-10-03T06:51:27+5:30
दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीची सत्ता, आता एकच लक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा आहे, असे सांगत शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केले.

मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
मुंबई : महायुतीने लोकसभा जिंकली, विधानसभा जिंकली आणि स्थानिक स्वराज्य संस्थादेखील महायुती जिंकल्याशिवाय राहाणार नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत महायुतीची सत्ता, आता एकच लक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा झेंडा डौलाने फडकवायचा आहे, असे सांगत शिवसैनिकांना कामाला लागण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात केले.
मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ येत आहे. आता ते मराठी माणसाचे नाव घेणार; पण मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार कुणी केले, कुणामुळे तो मुंबईबाहेर फेकला गेला, याचे कधी आत्मपरीक्षण केले आहे का?
निवडणुकीसाठी मराठी माणसाबद्दल तुमचे प्रेम उतू आले आहे. आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार अशी घिसीपीटी रेकॉर्ड लावणार; पण त्यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, कुणाच्या सात पिढ्या खाली आल्या तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही. मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाचीच राहणार आणि बाहेर गेलेल्या मुंबईकरांना पुन्हा इकडे आणण्याचे काम शिंदेसेना केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा समाचार घेतला.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांची सावलीदेखील त्यांच्यासोबत राहणार नाही, अशा शब्दात ठाकरेंवर निशाणा साधत मुंबई महापालिका त्यांच्या हातात गेली तर २५ वर्ष मागे जाईल, मुंबईची अधोगती होईल, मुंबईकर सुज्ञ आहे, तो विकासाला साथ देईल, असा विश्वासही शिंदे यांनी व्यक्त केला.
उद्धवसेनेचा पराभव करा, मुंबईवर भगवा फडकवा : रामदास कदम
येणारी महापालिका निवडणूक हे राजकीय युद्ध आहे. ही लढाई मराठी माणसाच्या अस्मितेची आहे. भगव्याच्या तेजाची आहे. गाफील राहू नका. उद्धवसेनेचा पराभव करत बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकवा, असे आवाहन शिंदेसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी केले. ठाकरेंनी ३० वर्षे पालिकेवर राज्य केले पण परळ, लालबाग, काळाचौकी, गिरगावचा मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला गेल्याचे ते म्हणाले.
तुमची शिवसेना आता कॉँग्रेसची झाली : गुलाबराव पाटील
इरशालवाडीची दुर्घटना घडली, तेव्हा पोलिसांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही जाऊ नका, जिवाला धोका आहे, असे सांगितले; पण माझे शेतकरी अडकलेले आहेत, असे सांगत शिंदे घटनास्थळी निघाले. आताही आम्ही शेतकऱ्यांना मदत केली तर त्यावरही टीका होते. आम्ही शिवसेनाप्रमुखांकडून ८० टक्के समाजकारण, २० टक्के राजकारण शिकलो. तुमची आता काँग्रेस झाल्याची टीका पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.
खास क्षण
> नेस्को परिसरात होर्डिंग्ज आणि इतर पोस्टर्सशिवाय सभागृहात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे १५ फूट उंचीचे ७ ते ८ कटआउट्स उभारण्यात आले होते. विशेष म्हणजे बाळासाहेबांच्या कटआउटपेक्षा दिघे यांच्या कटआउटची उंची काही इंचांनी कमी आणि त्यापेक्षा कमी उंचीचे शिंदे यांचे कटआउट ठेवण्याची दक्षता यात घेण्यात आल्याचे दिसले.
> गायक अवधूत गुप्ते यांनी ‘अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात, एकनाथ’ हे गाणे गायले आणि उपस्थित शिवसैनिकांनी भगवे झेंडे आणि शिंदे यांच्या लहान आकारातील प्रतिमा उंचावून दाद दिली, तसेच या गाण्याला वन्स मोअर मिळवला.
> बाळासाहेब ठाकरे यांनी मला बोलवून घेतले आणि एक अजरामर गाणे करून घेतले, अशी आठवण सांगत गायक अवधूत गुप्ते यांनी ‘शिवसेना... शिवसेना... शिवसेना...’ हे गाणे यावेळी गायले.
> उद्धवसेनेच्या दसरा मेळाव्याचे सूत्रसंचालन छोट्या पडद्यावरील कलाकार आणि उपनेते आदेश बांदेकर गेली अनेक वर्षे करीत आहेत. त्याच धर्तीवर शिंदेसेनेनेही आता सूत्रसंचालनाची घुरा छोट्या पडद्यावरील कलाकार अभिजीत खांडकेकर यांच्या खांद्यावर सोपवल्याचे दिसले.
> शिंदेसेनेचे मंत्री गुलबराव पाटील यांनी पक्षाच्या जळगाव जिल्हा शाखेमार्फत २५ लाखांची मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर केली.
> शेतकरी संकटात असल्याने कार्यक्रमात कोणतेही पुष्पगुच्छ स्वीकारण्यात आले नाही. तशी सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे मंत्री गुलबराव पाटील यांनी सांगितले.
> उद्धवसेनेचे माजी आ. राजन तेली आणि गंगापूरचे माजी आ. अण्णासाहेब माने यांचा एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश.