मित्रानेच आखला होता दरोड्याचा प्लॅन; ३ आरोपींना अटक, १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 19:00 IST2025-11-22T18:59:49+5:302025-11-22T19:00:01+5:30
चाकूचा धाक दाखवून चिकटपट्टीने तोंड, हात पाय बांधून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली होती.

मित्रानेच आखला होता दरोड्याचा प्लॅन; ३ आरोपींना अटक, १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
नालासोपारा (मंगेश कराळे) :- सातिवली विभागातील रिलायबल ग्लोरी या इमारतीतील एका घरात मंगळवारी दिवसाढवळ्या तीन आरोपींनी आई व मुलाला चाकूच्या धाकाने चिकटपट्टीने तोंड, हात पाय बांधून दरोडा टाकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दरोड्याचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी उलगडा केला आहे. पोलिसांनी ३ आरोपींना कर्नाटक राज्यातून ताब्यात घेऊन १० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हा गुन्हा करण्याचा प्लॅन फिर्यादी महिलेच्या पतीच्या मित्रानेच केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
सातिवली येथील रिलायबल ग्लोरी इमारतीच्या ए विंग मधील ३०१ सदनिकेत राऊत नावाचे परिवार राहतात. मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारास तीन आरोपी हातात चाकू घेऊन त्यांच्या घराची बेल वाजवली होती. त्यांनी दरवाजा उघडताच चाकूच्या धाकाने घरात घुसले होते. महिला आणि त्यांच्या मुलाच्या तोंडाला, हातापायाला चिकटपट्टी लावून बंधक बनवले. त्यानंतर आरोपींनी घरातून १२ तोळे सोन्याचे दागिने व मोबाईल असा ऐवज लुटून पळून गेले होते. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या गंभीर गुन्ह्याची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी उकल करून आरोपींना अटक करून गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना आदेश दिले होते.
या गुन्ह्याचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी समांतर तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरील वेगवेगळया ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी, भ्रमणध्वनींचे तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांनी दिलेल्या माहीतीच्या आधारे ओळख पटवली. आरोपी हे कर्नाटकच्या बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद तालुक्यातील नंदगाव येथे वास्तव्यास असल्याची माहीती प्राप्त करुन तात्काळ तपास पथक रवाना केले. पोलिसांनी आरोपी अशोक ऊर्फ बाबु राजु शिंदे, अब्दुल रऊफ हाशमी आणि रितीक रवी बेलंगी या तिघांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेल्या दागिन्यांतील ८ तोळे सोन्याचे दागिने तसेच आरोपीतांचे अंगझडतीतून मिळालेली रोख रक्कम व मोबाईल असा १० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तर प्रभाकर ऊर्फ काळु साहू, नूर हसन खान आणि सुरज किशोर जाधव हे तीन साथीदार आरोपी निष्पन्न झाले असून त्या फरार आरोपींचा पोलिस शोध घेत आहे. तिन्ही आरोपींना ३० नोव्हेंबर पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलिस उपायुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा दोन वसई युनीटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सपोनिरी सोपान पाटील, पोउपनिरी अजित गिते, संतोष घाडगे, सहाफौज संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहूल कर्पे, प्रशांत ठाकूर, दिलदार शेख, अनिल साबळे, अक्षय बांगर, मसुब रामेश्वर केकान तसेच सायबर शाखेचे सहाफौज संतोष चव्हाण यांनी केली आहे.