मुंबईच्या २२७ वॉर्डांची जबाबदारी सहा नेते आणि १२ उपनेत्यांवर, उद्धवसेनेचा ‘प्लॅन बी’देखील तयार, स्वबळाची चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 05:28 IST2025-06-13T05:28:50+5:302025-06-13T05:28:59+5:30

Mumbai Municipal Corporation Election:

The responsibility of Mumbai's 227 wards lies with six leaders and 12 deputy leaders, Shiv Sena UBT's 'Plan B' is also ready, a test of self-strength | मुंबईच्या २२७ वॉर्डांची जबाबदारी सहा नेते आणि १२ उपनेत्यांवर, उद्धवसेनेचा ‘प्लॅन बी’देखील तयार, स्वबळाची चाचपणी

मुंबईच्या २२७ वॉर्डांची जबाबदारी सहा नेते आणि १२ उपनेत्यांवर, उद्धवसेनेचा ‘प्लॅन बी’देखील तयार, स्वबळाची चाचपणी

- महेश पवार
मुंबई - उद्धवसेनेचे नेते व युवासेनाप्रमुख आ. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आगामी मुंबई महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी पक्षाकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडीने एकत्रित निवडणूक न लढल्यास ‘प्लॅन बी’ म्हणून स्वबळाची चाचपणीही केली आहे. त्यासाठी मुंबईतील २२७ वॉर्डांची जबाबदारी लोकसभानिहाय ६ नेते तर प्रत्येकी ३ विधानसभांची जबाबदारी १२ उपनेत्यांवर देण्यात आली आहे.

विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मुंबईतील विभागांचा अभ्यास करून त्यांना अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पक्ष निरीक्षकांनी आपला अहवाल उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. यानुसार महापालिका निवडणुकांची जबाबदारी नेते व उपनेते यांच्यावर निश्चित करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीने आगामी महापालिका निवडणूक एकत्रित लढल्यास २०१७ मध्ये निवडून आलेल्या जागांसह उद्धवसेनेने ज्या तत्कालीन अपक्ष नगरसेवकांनी त्यांना समर्थन दिले त्या जागांवर आणि दुसऱ्या क्रमांकाने पराभूत झालेल्या जागांवर दावा करावा, असे उपनेत्यांच्या बैठकीत ठरवण्यात आले. तसेच पक्ष सोडून गेलेल्या ४५ माजी नगरसेवकांविरोधात उपनेते, उपविभागप्रमुख किंवा सक्षम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात यावेत, असा विचारही यावेळी पुढे आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
उद्धवसेनेचे सुभाष देसाई, दिवाकर रावते, विनायक राऊत या ज्येष्ठ नेत्यांवर महापालिका निवडणुकीच्या प्रचार यंत्रणेची विशेष जबाबदारी दिली जाणार आहे. तर खा. अरविंद सावंत (दक्षिण मुंबई), खा. अरविंद सावंत (दक्षिण मध्य मुंबई), खा. संजय दीना पाटील (उत्तर पूर्व), आ. अनिल परब (उत्तर पश्चिम), आ. सुनील प्रभू (उत्तर मुंबई) व सचिव सुधीर साळवी (उत्तर मध्य) यांच्याकडे लोकसभानिहाय जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

Web Title: The responsibility of Mumbai's 227 wards lies with six leaders and 12 deputy leaders, Shiv Sena UBT's 'Plan B' is also ready, a test of self-strength

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.