Join us

आरटीओ, बेस्टचा अहवाल आल्यावर कोडे उलगडणार; अपघातात नक्की चूक कोणाची ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:03 IST

चूक नक्की  ड्रायव्हरची की बेस्टने भाडेतत्त्वावर घेतलेल्या ओलेक्ट्रा कंपनीच्या बसची हे आत्ताच सांगता येणार नाही. मंगळवारी कुर्ला बस डेपोमध्ये अपघातग्रस्त बेस्ट बसची आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी केली.

- महेश कोलेलोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बेस्ट बस दुर्घटनेचा अहवाल अजून गुलदस्त्यात आहे त्यामुळे चूक कोणाची हे आरटीओचा अहवाल आल्यानंतर स्पष्ट होईल. राज्य परिवहन विभाग (आरटीओ) आणि बेस्ट प्रशासन अहवाल तयार करणार आहे. 

परिवहन आयुक्त विवेक भिमनवार ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, अहवाल येण्यापूर्वी भाष्य करणे योग्य नाही. त्यामुळे चूक नक्की  ड्रायव्हरची की बेस्टने भाडेतत्त्वावर घेतलेल्या ओलेक्ट्रा कंपनीच्या बसची हे आत्ताच सांगता येणार नाही.  मंगळवारी कुर्ला बस डेपोमध्ये अपघातग्रस्त बेस्ट बसची आरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्यांनी बसचे ब्रेक, स्टिअरिंग आणि एक्सिलेटर यांची तपासणी केली. त्यात त्यांना त्रुटी दिसली नाही असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बस आधुनिक असल्याने बेस्ट आणि ओलेक्ट्रा कंपनी इतर यंत्रांच्या साहाय्याने तिची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे चूक नक्की कोणाची हे समजण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.  इलेक्ट्रिक बस एक्सिलेटर सोडताच अशा बस लगेच थांबतात. त्यामुळे ही बस ४०० मीटर फरफटत कशी गेली, असा प्रश्न एका अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. 

अपेक्षित प्रशिक्षण नाहीइलेक्ट्रिक ऑटोमॅटिक गाडी चालविण्याचे ड्राइव्हरला तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले होते; परंतु बेस्टच्या निवृत्त प्रशिक्षण अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वेट लिझवर घेण्यात येणाऱ्या गाड्यांच्या चालकांना अपेक्षित प्रशिक्षण देण्यात येत नाही, तसेच कंत्राटदार मनुष्यबळ पुरवठा करताना योग्य रीतीने तपासणी न करता नसल्याने अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे २०१३ नंतर न झालेली बेस्टच्या स्वतःच्या चालकांची भरती तात्काळ करणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :कुर्लाबेस्ट