Join us

पोलिसानेच ‘सुंदरी’ बनून आरोपीला ओढले ‘जाळ्यात’; लढवली अनोखी शक्कल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 13:35 IST

आरोपी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असल्याचे दिसताच पोलिसांनी मुलीच्या नावाने अकाउंट बनवून त्याला रिक्वेस्ट पाठवली.

मुंबई : एका तरुणावर वार करत पसार झालेल्या हल्लेखोराला पकडण्यासाठी पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली. ओळख लपवून सतत पोलिसांना गुंगारा देत असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. आरोपी इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह असल्याचे दिसताच पोलिसांनी मुलीच्या नावाने अकाउंट बनवून त्याला रिक्वेस्ट पाठवली. सुंदर मुलीचा फोटो बघून त्याने रिक्वेस्ट स्वीकारली. तिच्या मधाळ संवादात हरवून गेला. तोपर्यंत पोलिसांनी माग काढत त्याच्या मुसक्या आवळल्या. प्रत्यक्षात पोलिसांनीच इन्स्टाग्रामवरून रचलेल्या हनीट्रॅपमध्ये अडकल्याचे लक्षात येताच डोक्यावर हात मारण्याची वेळ आरोपीवर आली.शुभम कोरी (१९) असे आरोपीचे नाव असून, त्याच्याविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. धारावीत राहणाऱ्या शुभमचा एका  तरुणाशी वाद झाला होता. तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून शुभम पसार झाला. गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ निरीक्षक राजा बिडकर, पोलिस निरीक्षक अशोक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विकास शेलार व त्यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. अटकेपासून वाचण्यासाठी शुभम मोबाइल वापरत नव्हता. सतत वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. त्याने नातेवाईक, कुटुंबीयांसोबतचाही संपर्क तोडला होता.पोलिसांनी त्याचा सोशल मीडियावरून पाठलाग सुरू केला. तो इन्स्टाग्रामवर सक्रिय असल्याचे समजताच पोलिसांनी तोच धागा पकडून तपासाला सुरुवात केली. सुंदर तरुणीच्या नावाने पोलिसांनी इन्स्टाग्राम खाते बनवून शुभमला रिक्वेस्ट पाठवली. त्याने मुलीची रिक्वेस्ट तत्काळ स्वीकारली. तिच्याशी चॅटिंग सुरू केले. तरुणीच्या मधाळ संवादात हरवून पोलिसांनी त्याचे नाशिकमधील लोकेशन शोधले. तेथील अंबड पोलिसांनी सिडको कॉलनीतून त्याच्या मुसक्या आवळल्या.

अटकेनंतर रुग्णालयात दाखल अचानक पोलिस धडकल्याने शुभम चक्कर येऊन कोसळला. त्याला लहानपणापासून फिट्स (मिरगी) येतात. पोलिसांनी त त्याला नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले. मुंबईत घेऊन येत असताना त्याला पुन्हा चक्कर आली. पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याबाबत सांगून त्याला सायन रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

टॅग्स :गुन्हेगारीमुंबईपोलिस