विमान उडाले अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर, महाराष्ट्रात परतण्याची खात्री पटल्यानंतर डोळे पाणावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 06:15 IST2026-03-04T06:15:27+5:302026-03-04T06:15:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : फुजेरा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले आणि सर्व प्रवाशांनी एकमुखाने गणपती बाप्पा मोरयाचा ...

विमान उडाले अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर, महाराष्ट्रात परतण्याची खात्री पटल्यानंतर डोळे पाणावले
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : फुजेरा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाने मुंबईसाठी उड्डाण घेतले आणि सर्व प्रवाशांनी एकमुखाने गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर केला. आखाती देशांत पेटलेल्या युद्धामुळे दुबईत अडकलेल्या या प्रवाशांना महाराष्ट्रात कधी परतणार याची शाश्वती नव्हती. अशा परिस्थितीत दोन विशेष विमाने दाखल झाली व सर्वांचा अक्षरश: बांध फुटला.
१६४ प्रवाशांना फुजेरा येथे आणण्यात आले होते. येथून विशेष विमाने उपलब्ध करून दिली. फुजेरा युएईच्या पश्चिमेला असल्यामुळे दुबईची सीमा येथून लवकर सोडली जाऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन येथूनच दोन विशेष विमानांनी प्रवाशांना मुंबईत परत आणण्याचा निर्णय घेण्यात आला. सोमवारी सायंकाळी दोन्ही विमाने फुजेरा विमानतळावर दाखल होताच प्रवाशांनी एकच जल्लोष केला. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत देवाचे शतश: आभार मानले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
फुजेरा विमानतळाच्या संचालकांनी प्रवाशांची केली पूर्ण व्यवस्था
फुजेरा विमानतळावर सर्व प्रवाशांची विमानतळ संचालकांनी संपूर्ण व्यवस्था केली होती. त्यांचे खानपान तसेच इतर सर्व सोयीसुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली. संचालकांनी सर्व प्रवाशांची व्यक्तीश: भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. तसेच धीर दिला. संचालकांनी उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांबद्दल प्रवाशांनी त्यांचे आभार मानले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चाने दोन विशेष विमाने प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिली. या विमानांद्वारे सर्वांना मुंबईत आणण्यात आले.