Join us
Daily Top 2Weekly Top 5

भाचा ईडीला म्हणाला, दाऊदमामा कराचीतच; सणासुदीला असतो संपर्कात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 08:16 IST

अलिशाह पारकरची तपास यंत्रणांना माहिती; सणासुदीला कुटुंबीयांच्या संपर्कात

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कराचीमध्ये असल्याची माहिती त्याचा भाचा अलिशाह पारकरने केंद्रीय तपास यंत्रणांना दिली. सण-उत्सवाला दाऊदची पत्नी कुटुंबीयांशी संपर्क करीत असल्याचा दावाही केला आहे. अलिशाहकडून सक्तवसुली संचालनालयाला (ईडी)  मिळालेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्यासह त्याचे कुटुंबीय आणि टोळीतील सदस्यांच्या मालमत्ता, बेनामी संपत्तीतील आर्थिक बाबींशी संबंधित मनी लाॅण्ड्रिंग प्रकरणात ईडी तपास करीत आहे. कुर्ला येथील गोवावाला कंपाउंडची जमीन दाऊदची बहीण हसिना पारकर हिने बळकावली होती. नवाब मलिक यांनी ही मालमत्ता तिच्याकडून कमी भावात खरेदी केल्याचा आरोप असून, ईडीने २३ फेब्रुवारीला त्यांना अटक केली. सध्या ते आर्थर रोड कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून ही माहिती समोर आली आहे. ईडीने यापूर्वी अलिशाहच्या नोंदवलेल्या जबाबानुसार, १९८६ मध्ये त्याचा जन्म झाला. त्याआधीच मामा देश सोडून निघून गेला. १९८६ पर्यंत दक्षिण मुंबईतील डंबरवाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावर ते राहत होते.  ईद, दिवाळी तसेच अन्य सणांच्या दिवशी दाऊदची पत्नी आणि त्याची मामी मेहजबीन दाऊद इब्राहिम, पत्नीसह मैत्रिणींच्या संपर्कात असल्याचे त्यांने नमूद केले आहे. अलिशाह सध्या कुटुंबीयांसह दुबईत असून, या चौकशीच्या ससेमिरापासून वाचण्यासाठी तेथेच स्थायिक होण्याच्या तयारीत आहे.  गँगवॉर, हत्या, खंडणीपाठोपाठ १९९३ ला मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा दाऊद मास्टरमाइंड आहे. 

टॅग्स :दाऊद इब्राहिमपाकिस्तानअंमलबजावणी संचालनालय