Join us  

योग्यवेळीच निर्णय घेण्याची गरज; प्रवीण दरेकरांनी भोंग्यावरुन महाविकास आघाडी सरकारला दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 3:59 PM

राज ठाकरेंच्या या भूमिकेचं भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केलं आहे.

मुंबई- भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराच मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेचं भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांसाठी समान लागू झाला पाहिजे. त्यासाठी नियम आणखी कठोर केले, तरी चालतील. ज्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय पाळला जात नाही, त्याठिकाणी कायदा हातात घेण्याचे वक्तव्य समोर येत असतात, असं प्रवीण दरेकर म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी योग्यवेळीच निर्णय घेण्याची गरज असल्याचे देखील प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले. 

दरम्यान, राज ठाकरेंनी रविवारी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्याचा विषय काढला. देशभरातल्या नागरिकांना माझं एवढंच सांगणं आहे की, भोंग्याचा विषय धार्मिक नाही, सामाजिक आहे. भोंग्यामुळे फक्त हिंदुना नाही, तर मुस्लिमांनाही त्रास होतोय, त्यामुळे ३ तारखेपर्यंत आम्ही शांत बसू आणि नंतर जशास तसं उत्तर देऊ, असा इशाराच राज ठाकरेंनी यावेळी दिला.

मुस्लिमांच्या प्रार्थनेला विरोध नाही- राज ठाकरे

"आमचा मुस्लिमांच्या प्रार्थनेला काहीच विरोध नाही. आमचा विरोध भोंग्याला आहे. मला देशातली शांतता भंग करायची नाही. मुस्लिमांनीही माणुसकीच्या नजरेने पाहावे. त्यांनी प्रार्थना कराव्या, पण लाउडस्पीकरवरुन ऐकवणार असलीत, तर त्यांनाही आमच्या आरत्या ऐकाव्या लागतील," असेही राज ठाकरे म्हणाले.

भोंग्याचा त्रास मुस्लिमांनाही- राज ठाकरे

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, "इथे पत्रकार परिषदेत एक मुस्लिम पत्रकार आले आहेत, ते आमच्या बाळा नांदगावकर यांना भेटले. त्यांनी सांगितलं की, नुकतंच मला लहान मूलं झालं, भोंग्याच्या आवाजामुळे त्याला त्रास होत होता. त्यानंतर मी मशिदीत जाऊन भोंगा बंद करण्यास सांगितलं. यावरुन दिसून येतं की, भोंग्याचा त्रास फक्त हिंदुनांच नाही, तर मुस्लिमांनाही होतोय."

टॅग्स :प्रवीण दरेकरभाजपाउद्धव ठाकरेमहाराष्ट्र विकास आघाडीमहाराष्ट्र सरकार