‘आंदोलनातील आव्हानात्मक व्यवस्था पालिकेने पेलली’
By सीमा महांगडे | Updated: September 4, 2025 10:50 IST2025-09-04T10:48:56+5:302025-09-04T10:50:09+5:30
...हे काम आव्हानात्मक असले, तरी आंदोलनाच्या वेळी शनिवार, रविवार असूनही ताण न येता प्रत्येक यंत्रणेने नीट काम केल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी ‘लोकमत’शी बाेलताना म्हणाल्या.

‘आंदोलनातील आव्हानात्मक व्यवस्था पालिकेने पेलली’
सीमा महांगडे -
मुंबई : मराठा आंदोलनाची माहिती मिळताच मुंबई महापालिकेने प्राथमिक सुविधांची तयारी करून ठेवली होती, परंतु आंदोलकांची संख्या मोठी असल्याने आम्ही तत्काळ सुविधांमध्ये वाढ केली. पालिका अधिकाऱ्यांच्या ६ टीम्स तयार करून जबाबदारी देण्यात आली होती. जसजशी आवश्यकता वाढत होती, त्याप्रमाणे सुविधांची संख्याही वाढवली जात होती. हे काम आव्हानात्मक असले, तरी आंदोलनाच्या वेळी शनिवार, रविवार असूनही ताण न येता प्रत्येक यंत्रणेने नीट काम केल्याचे मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी ‘लोकमत’शी बाेलताना म्हणाल्या.
स्वच्छता कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करताना काय करावे लागले?
आंदोलनाचे पाचही दिवस परिसरात स्वच्छता राखण्याचे आव्हान सफाई कर्मचाऱ्यांवर होते. त्याचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने झाले. परिसरात अस्वच्छता पसरल्यास आजार, रोगराई फैलावण्याची भीती असल्याने विशेष काळजी घेण्यात आली. ए विभागातील अधिकाऱ्यांनी आधीच काही सामाजिक संस्थांची सफाईसाठी मदत घेतली. या कर्मचाऱ्याशिवाय प्रत्येक विभागातील किमान ५० कर्मचारी म्हणजेच १० टक्के कर्मचारी आझाद मैदान परिसरात स्वच्छतेसाठी बोलवण्यात आले. त्यामुळे त्या संबंधित विभागातील यंत्रणेवरही ताण आला नाही. सर्व स्वच्छता कर्मचारी ३ सत्रात नेहमीच्या ८ तास कार्यरत होते.
काेणते काम आव्हात्मक होते?
पाचही दिवस आव्हात्मक होते. आसपासच्या परिसरात रोगराई, आजार पसरू नये, याची विशेष काळजी घेणे गरजेचे होते. त्यासाठी पालिकेने ५ दिवसात ११० टन कचरा गोळा केला. जंतुनाशकाची भुकटी, ब्लिचिंग भुकटी फवारणी केली. पाण्याचे ४० हून अधिक टँकर आणि आणि ४०० पेक्षा अधिक स्वच्छतागृह उपलब्ध केली. आरोग्य विभागाकडून २४ तास वैद्यकीय कक्ष कार्यरत ठेवण्यात आला होता.
पालिकेला या सगळ्या सुविधांसाठी अतिरिक्त खर्च आला का?
अतिरिक्त खर्च आला नाही. सफाई कर्मचारी, आरोग्य अधिकारी, जंतुनाशक विभागाच्या पालिकेच्या टीम होत्या. जे ४० हून अधिक पाण्याचे टँकर्स वापरले ते ही पालिकेच्याच टँकर फिलिंग पॉइंटवरून भरल्याने त्यासाठी ही अतिरिक्त निधी वापरावा लागला नाही. प्रकाश व्यवस्थेसाठी वापरण्यात आलेले दिवे हे अग्निशमन दलांच्या माध्यमातून करण्यात आले होते. आंदोलकांना देण्यात आलेल्या प्राथमिक सुविधा या पालिकेच्याच असल्यामुळे अतिरिक्त निधीचा विषय आला नाही.
भविष्यात अशावेळी कशी तयारी असावी, याचे धडे यातून मिळाले का?
आझाद मैदानात विविध आंदोलने आणि मोर्चे होत असतात. त्यासाठीच्या प्राथमिक सुविधा पालिकेकडून उपलब्ध करून दिलेल्या आहेत. भविष्यात ही असे काही घडल्यास पालिका नेहमीप्रमाणेच सुविधांसह अशीच तयार असेल.